शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव – अब्दुल सत्तार

0
504

मुंबई, दि. १ (पीसीबी) – निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. त्यातच मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपाच्या फॉर्म्युलावरून शिवसेना आणि भाजपमामध्ये अद्यापही एकमत झालेले नाही. अशातच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप सत्तार यांनी केला.

“शिवसेनेला समाजसेवा हवी आहे. शिवसेनेत समाजसेवा जास्त आणि राजकारणाला कमी महत्त्व आहे. परंतु भाजपाला सत्ता हवी आहे. भाजपाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच सत्तावाटपासंदर्भात चर्चा न होण्याची अनेक कारणे आहेत. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे,” असे सत्तार यावेळी म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. “केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीदरम्यान जे काही सांगितले तसे ते वागले नाहीत. म्हणून आज अशी परिस्थिती उद्भवत आहे. मोठ्या भावाला छोटे करण्याचे षड्यंत्र रचले जात असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते ओळखले आहे,” असे सत्तार म्हणाले.

“भाजपाला राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिसत नाही. त्यांना केवळ खुर्चीची चिंता आहे. युतीमध्ये केवळ आपले मत मांडून चालत नाही. राष्ट्रपती राजवटीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य हे केवळ शिवसेनेवर दबाव निर्माण करण्यासाठी केलेले आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत राज्यात नक्कीच सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची आम्ही वेळच येऊ देणार नाही. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. फक्त आम्हाला देण्यात येणारी आश्वासने लेखी स्वरूपात हवी आहेत. उद्या जर भाजपा म्हणाले आम्ही असे बोललोच नाही, तर अशावेळी आम्ही काय करायचे? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. युतीमध्ये सन्मानाने वागवणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्व गोष्टींची जाण आहे. त्यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. ते योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.