शिवसेनेचा दसरा मेळावा दणक्यात होणार

0
321

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याच्या चर्चा निष्फळ आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. कुणी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल ? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असं सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना संजय राऊत यांनी दसऱ्या मेळाव्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या या मेळाव्याचे महत्त्व आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ऑनलाइन होत आहेत. पण मी आजच वाचलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत. त्या कशाप्रकारे सभा घेतात त्याचा आम्ही अभ्यास करू…नियम वैगरे आहेतच. शेवटी या राज्यात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत. सरकारने काही नियम केले आहेत. कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही, असं सांगतानाच दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यावर निर्णय होईल. मला वाटतं यंदाचा दसरा मेळावाही व्यासपीठावरच होईल. काही मार्ग काढता येईल. चर्चा सुरू आहे.

अभिनेत्री कंगना रनौतवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्याबाबत विचारले असता राऊत यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले. मला याबाबत कल्पना नाही. न्यायालयाच्या कारवाईचा आदर करायला हवा, असं सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.