शिवसेना-राष्ट्रवादीच्या हजारो पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश

0
705

मुंबई,दि.६(पीसीबी) – महाराष्ट्रात स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतरही खदखद दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना-राष्ट्रवादीच्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. यामध्ये रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही मनसेची वाट धरली आहे.स्थानिक नेत्यांची मनमानी, मान-सन्मान किंवा पद मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर समस्या मांडूनही होणारं दुर्लक्ष यासारख्या कारणांमुळे सेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. अखेर ती पक्षांतराच्या रुपाने बाहेर पडली.

दरम्यान, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेनेचा दुखावलेला कट्टर हिंदुत्ववादी मतदार मनसेकडे खेचण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीत मनसेची ताकद वाढवण्यासाठी ही रणनीती बनत असल्याचं बोललं जात आहे.