शिवशंभो कॉलनीची नऊ वर्षांची तहान भागणार; महापालिकेच्या पाण्याचा रखडलेला मार्ग मोकळा

0
246

– स्थानिक नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचा चार वर्षांचा लढा यशस्वी
– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने निघाला तोडगा

पिंपरी,दि.१३ (पीसीबी) – नागरिकांनी जागा घेऊन घरकुल उभारले मात्र, रस्त्याच्या वादामुळे महापालिकेच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी अडचणी निर्माण झाल्या. शहरात असूनही एक दोन नाही तर तब्बल नऊ वर्षांपासून त्यांना बोअरवेलच्या पाण्याशिवाय पर्याय नव्हता. नागरिकांची हतबलता विचारात घेऊन नगरसेविका सारिका नितीन बोऱ्हाडे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न आणि पाठपुराव्याची शिकस्त केली. अखेर त्यांच्या चार वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले.

खाजगी जागा मालक विलास जेऊरकर यांनी जागा दिल्याने पाईपलाईनचे काम मार्गी लागणार असून प्रभाग क्रमांक दोनमधील शिवशंभो कॉलनीची तब्बल नऊ वर्षांची तहान भागणार आहे.

शिवशंभो कॉलनी परिसरातील बांधकाम व्यावसायिकांनी प्लॉटिंग करून नागरिकांना जागा विकल्या आणि कॉलनी तयार झाली. दरम्यान, त्या जागेला येणारा रस्ता दुसऱ्या शेतकऱ्यांचा असल्यामुळे नागरिकांना महानगरपालिकेची पिण्याचे पाईपलाईन टाकणे शक्य नव्हते. यामुळे नागरिकांना नऊ वर्षांपासून बोअरचे पाणी वापरावे लागत होते. यामुळे महापालिका हद्दीत असूनही आणि सर्व कर भरूनही नागरिकांची तहान मात्र कायम होती. या प्रकरणी नागरिकांनी भाजप नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. बोऱ्हाडे यांनी हा विषय आमदार महेश लांडगे यांच्याकडे मांडत त्यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांनुसार पाठपुरावा सुरु केला. त्यानुसार अनेक भेटीगाठी, बैठका आणि चर्चा झाल्या.

खाजगी जागा मालक विलास जेऊरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या खासगी जागेतून दोन मीटर रास्ता या कामासाठी दिला आहे. विलास जेऊरकर म्हणाले की, नगरसेविका सारिका व नितीन बोऱ्हाडे यांनी मला भेटून सांगितले की, शिवशंभु कॉलनीतील रहिवाशांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न नऊ वर्षापासून प्रलंबित आहे. तसेच पिण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. नागरिकांच्या गरजेला प्राधान्य देत मी जागा देण्याचा निर्णय घेतला.

*नागरिकांचे समाधान ही कामाची पावती : सारिका बोऱ्हाडे
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनामुळे कामाला यश आले. चार वर्षे पाठपुरावा केला यापेक्षा ही समस्या दूर झाली याचे समाधान अधिक आहे. जेऊरकर यांनी जागा दिल्याने हे शक्य झाले असून त्यांचे जाहीर आभार मानले आहेत. तब्बल नऊ वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आनंदाचे वातावरण आहे. आणि नागरिकांचे समाधान ही कामाची पावती असल्याच्या भावना नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी व्यक्त केल्या आहेत.