शिवरायांच्या स्मारकांपासून युवापिढीला प्रेरणा मिळेल – उषा वाघेरे-पाटील

0
652

पिंपरी वाघेरे गांवातील सिंहासनास्थ शिवस्मारकाचे जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते अनावरण

पिपंरी, दि.२३ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या पराक्रमातून पराक्रमाचे, आदर्श विचारांचे धडे मिळतात. त्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नानंतर पिंपरी वाघेरे गाव येथे छत्रपती शिवरायांचा सिंहासनास्थ पुतळा आणि शिवस्मारक साकारले जात आहे. शिवरायांच्या या स्मारकापासून युवा पिढीला प्रेरणा मिळले, असे प्रतिपादन स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषाताई संजोग वाघेरे-पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून पिंपरीगाव येथे साकारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून आज, सोमवारी अनावर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पिंपरीगावातील आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व संस्थांचे कार्यकर्ते, सांप्रदायिक क्षेत्रातील वारकरी मंडळी, लहान तसेच तरुण मुले मुली आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवस्माराबाबत माहिती देताना उषाताई संजोग वाघेरे म्हणाल्या की, १९ डिसेंबर २०१४ रोजी तत्कालीन आयुक्त प्रभागात आले होते. त्यावेळी पिंपरी वाघेरे गावामध्ये असेलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा सिंहासनस्थ पुतळा व आवश्यक कामे करून शिवस्मारक उभारण्याची बाब निदर्शनास आणून दिली. १५ जुलै २०१५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर सुधारणा समितीत ठराव करून छत्रपती शिवाजी महाराज सिहासनस्थ पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर केला. २५ ऑगस्ट २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत (सभा क्रमांक – ४७, विषय क्रमांक – १०, ठराव क्रमांक ७४०) हा सिंहासनस्थ पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. १० जानेवारी २०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनस्थ पुतळ्याच्या क्ले मॉडेलला मान्यता दिल्याचे महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाने सर्व संबंधित यंत्रणांसह आपल्याला देखील लेखी कळविले होते.

२७ जानेवारी २०२० रोजी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत परवानगी मिळाली. १७ मार्च २०२० रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी मिळाली. २९ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे आवश्यक परवानग्या मिळाल्याने पुतळा बसविण्यासाठी परवानगीसाठी पत्रव्यवहार केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि संपूर्ण हिंदूस्थानाचा अभिमान असलेले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारत असताना सर्व प्रकारची प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची पुर्तता करणे आवश्यक होते. अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद उपलब्ध करून देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, तसेच सातत्यपूर्ण प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज साकारण्यात आला आहे. हे शिवस्मारक माध्यमातून त्यांचे विचार, आदर्श चरित्र नवीन पिढीसमोर राहणार आहे.