शिर्डी साईबाबा संस्थानकडून तीन पत्रकारांवर गुन्हा दाखल; नक्की काय आहे प्रकरण

0
547

शिर्डी, दि.०२ (पीसीबी) : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर साई मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. त्या दिवशी मंदिर परिसरात गर्दी करत भक्तांच्या मुलाखती घेतल्याचे कारण देत साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर ‘एबीपी’ या वाहिनीच्या तीन पत्रकारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

16 नोव्हेंबर 2020 रोजी साई मंदिर भक्तांना दर्शनाकरिता खुले करण्यात आले होते. याचदिवशी सकाळी समाधी मंदिराच्या मागे गुरुस्थान मंदिरासमोर ‘एबीपी माझा’ या न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी, नितीन ओझा व कॅमेरामन यांनी लाइव्ह प्रक्षेपण सुरू केले. यावेळी मुलाखत देण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. मी व कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी ‘एबीपी माझा’च्या प्रतिनिधींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी वादावादी करत सरकारी कामात अडथळा आणला, असे ठाकरे यांनी फिर्यादित म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मुकुल कुलकर्णी, नितीन ओझा व कॅमेरामनवर गुन्हा दाखल केला.

पत्रकारांवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणाचा शिर्डीतील पत्रकार व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संस्थानचे कार्यकारी अधिकारी व ग्रामस्थांमध्ये संघर्ष सुरू आहे. याबाबतच्या बातम्या सातत्याने दिल्याने संस्थानने पत्रकारांना मंदिर परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. पत्रकार दाखवत असलेल्या बातम्यांचा राग येऊन खोटा आणि सूडभावनेतून गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रारच बेकायदा असून, नागरिक व पत्रकारांत दहशत पसरावी या हेतूने कार्यकारी अधिकारी बगाटे व ठाकरे काम करत आहेत. मनमानी कारभार करणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार व ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरीश दिमोटे, सतीश वैजापूरकर, नितीन मिराने, मनोज गाडेकर, अशोक सदाफळ, राजेंद्र जाधव, सुनील दवंगे, किशोर पाटनी, किरण सोनवणे, सचिन बनसोडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, बगाटे हे मनमानी कारभार करून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक रवींद्र गोंदकर, प्रमोद गोंदकर यांनी केली आहे.