शिरूर मतदारसंघात शिवसेनेला धक्का; जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या पुतण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
1422

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – मतदानाला अवघे दोन दिवस बाकी असताना शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिरूर महिला जिल्हा संघटिका आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या स्टार प्रचारक सुलभा उबाळे यांचा पुतण्या विशाल उबाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आमदार अजितदादा पवार यांनी उबाळे यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. त्यामुळे शिरूर मतदारसंघात शिवसेनेची काय स्थिती झाली आहे, यावरून स्पष्ट होत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला एकतर्फी विजय मिळेल आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा सहज खासदार होतील, असे मानले जात होते. राष्ट्रवादीला आधी उमेदवारही मिळत नसल्याची स्थिती होती. त्यातच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेनेतून आणून राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने आढळराव पाटील हे निश्चितच विजयी होतील, असा राजकीय अंदाज बांधला जात होता. परंतु, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आपण सुद्धा राजकारणातले “लंबी रेस के घोडे” आहोत, हे सिद्ध केले. डॉ. कोल्हे आणि राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराने शिवसेनेला विजय सोपा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीला मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आढळराव पाटील चौथ्यांदा खासदार होतील का? हे सांगणे कठीण बनले आहे. अनेक राजकीय तज्ज्ञ आढळरावांचा पराभव होईल, असाच अंदाज बांधत आहेत. भाजपशी संलग्न असलेल्या एका संघटनेनेने केलेल्या सर्वेक्षणात आढळराव पाटील विजयी होऊ शकणार नाहीत, असे आढळून आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता मतदानाला अवघे दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे शिरूर मतदारसंघात कोण जिंकणार आणि कोण हरणार हे २३ मे यादिवशी स्पष्ट होईल.

मतदारसंघात राष्ट्रवादीला मिळणारा प्रतिसाद आणि मतदानाला उरलेले दोन दिवस या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा नशीब आजमावलेल्या शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांचा पुतण्या विशाल उबाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजितदादांनी विशाल उबाळे यांचे पक्षात स्वागत केले. सुलभा उबाळे या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान जिल्हा संघटक आहेत. त्याचप्रमाणे त्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या स्टार प्रचारक सुद्धा आहेत.

असे असताना सुलभा उबाळे यांना स्वतःचे घर सुद्धा सांभाळता आले नसल्याचे चित्र आहे. त्यांचा पुतण्याच राष्ट्रवादीत गेल्याने उबाळे या आढळराव पाटील यांना विजयी करा, असे इतरांना कसे सांगणार हा खरा प्रश्न आहे. शिरूर मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर सुरू असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरातीलच व्यक्ती शिवबंधन तोडत असल्याचा संदेश मतदारांमध्ये गेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणखीन मजूबत झाली आहे. तसेच सुलभा उबाळे यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित होऊ लागले आहे.