शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेंना उमेदवारी?; राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना तिसऱ्यांदा बाय दिला जाणार?

0
1698

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसे झाल्यास शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय आणखी सोपा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे. पिंपरी-चिंचवड शहराने कोल्हे यांचे राजकारण अनुभवलेले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख असताना कोल्हे यांना शहराच्या राजकारणात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यांनी वाकडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून काय काय राजकीय व्यवहार केले, याच्या अनेक सुरस कथा आजही शहरात चर्चिल्या जातात. त्यामुळे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कोल्हे यांना उमेदवारी म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राजकीय बाय दिल्यासारखेच मानले जाणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादीची अवस्था सांगताही येईना आणि सहनही होईना, अशी झाली आहे. थेट शरद पवार यांनाच आव्हान देणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची, या बुचकळ्यात राष्ट्रवादीत सापडली आहे. नाही म्हणता अजितदादा पवार यांनी शिरूरमध्ये मीच उभा राहिलो असतो, असे म्हणत मध्यंतरी राजकीय ट्विस्ट निर्माण केले. परंतु, उमेदवार निश्चित होत नसल्याने मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी पक्षाने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना निवडणुकीच्या घोड्यावर बसवले. संपूर्ण मतदारसंघात फ्लेक्सबाजी करायला लावून आता लांडे हे आढळराव पाटील यांच्या विरोधात लढणार अशी वातावरणनिर्मिती केली.

शिरूरच्या ग्रामीण मातीतील राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता चंदन सोंडेकर यांनीही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत पक्षश्रेष्ठींना दखल घेण्यास भाग पाडले. सोंडेकर हा तरूण चेहरा सर्वमान्य उमेदवार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच राष्ट्रवादीत सामान्य व निष्ठावान कार्यकर्त्यालाही मोठी संधी दिली जाते हा संदेश महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी शेवटच्या क्षणी का होईना सोंडेकर यांच्या नावाला पसंती दिली जाईल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, गेल्या आठवड्यात अचानकपणे अभिनेते आणि जुन्नर तालुक्याचे रहिवाशी डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला गेला. त्यामुळे शिरूरमध्ये कोल्हे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तसे झाल्यास शिरूर मतदारसंघात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा अगदी विजय सहज होईल, असे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे. पिंपरी-चिंचवड शहराने कोल्हे यांचे राजकारण जवळून अनुभवलेले आहे. ते शिवसेनेत असताना शहराचे संपर्कप्रमुख होते. सर्वांना एकदिलाने सोबत घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्याचे नेतृत्व कोल्हे यांना सिद्ध करता आलेले नाही. शिवसेनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली. त्यात शिवसेनेचा सुपडा साफ झाला. पक्षसंघटनेत मिसळण्याऐवजी कायम वाकडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून सर्व निर्णय घेतले जातात, ही खंत शिवसैनिकांनी अनेकदा बोलून दाखवली होती. या हॉटेलमध्ये आणखी काय काय आणि कोणकोणते राजकीय व्यवहार चालायचे, याच्या अनेक सुरस कथा आजही शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चिल्या जातात.

आता तेच अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिरूर मतदारसंघात उभे राहिल्यास भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना साथ मिळणे अवघड आहे. त्यातच या मतदारसंघात राष्ट्रवादीची राजकीय अवस्था अत्यंत वाईट आहे. आजही या मतदारसंघात राष्ट्रवादीला १०० टक्के बुथप्रमुख नेमता आलेले नाहीत, हे वास्तव आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिका केल्या म्हणून मतदार आपल्याला मतदान करतील, अशी भाबडी आशा राष्ट्रवादी आणि अमोल कोल्हे यांच्यात निर्माण झाली आहे. कोणी चांगला अभिनय करतो म्हणून त्याला राजकारणातही यश मिळेल, असे होत नाही. तीच परिस्थिती अमोल कोल्हे यांची आहे. त्यामुळे ते शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्यास आढळराव पाटील हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.