शहीद मेजर महाडिक यांच्या पत्नी होणार अधिकारी

0
992

मुंबई, दि. १ (पीसीबी) – पतीचे चीन सीमेवर कर्तव्य बजावताना अपघातात निधन झाले. पण त्यात न डगमगता स्वत: अधिकारी होण्याचा निर्धार हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी यांनी मनाशी बाळगला आहे. याच निर्धार सोबत घेऊन त्या एप्रिल महिन्यात चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत (ओटीए) प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहेत.

विरार येथील मेजर प्रसाद महाडिक हे ७ बिहार तुकडीत होते. अरुणाचल प्रदेशात तैनाती वेळी मागील वर्षी त्यांच्या तंबूला आग लागली. त्यात ते हुतात्मा झाले. या घटनेमुळे त्यांच्या पत्नी गौरी यांना चांगलाच धक्का बसला. पण त्यांच्यातील जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कंपनी सचिव व विधी स्नातक असे दुहेरी व्यावसायिक शिक्षण असतानाही त्यांनी देशसेवेसाठी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा दिली. पण पुरेशा तयारीअभावी पहिल्या प्रयत्नात त्या अयशस्वी ठरल्या. पण कंपनी सचिवासारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केलेल्या गौरी यांच्यात चिकाटी होती. जिद्दीनेच त्यांनी पुन्हा परीक्षा दिली व ३२ वर्षीय गौरी परीक्षेनंतरच्या मुलाखतीत १६ जणींमधून पहिल्या स्थानी आल्या.

आता पुढील टप्प्यात गौरी यांना ओटीएचे कठीण असे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. या प्रशिक्षणाअंती पुढील मार्चमध्ये त्या अधिकारी होतील. पण ‘मी लवकरच लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक होईन. माझ्या पतीच्या खांद्यावर जे स्टार्स होते, तेच मला मिळतील. मीसुद्धा तो गणवेश परिधान करीन. तो गणवेश आम्हा दोघांचा असेल. त्यामुळे खडतर प्रशिक्षणाची तमा नाही,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. ‘मुळात रडत बसायचे नाही. काही तरी वेगळे करायचे,’ या ध्येयाने त्यांना पछाडले आहे. त्यातूनच त्या चांगली नोकरी सोडून सैन्यसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. गौरी व प्रसाद यांचा विवाह चार वर्षांपूर्वी २०१५ मध्ये झाला होता.