पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – दोन वर्षांच्या कोरोना संक्रमण काळानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यातील वैष्णव “श्री हरी” भेटीसाठी देहू ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी झाले. जगद्गगुरु संत तुकाराम पालखीचे यंदाचे 337 वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटी व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी मार्ग व शहर परिसरात 337 वड, पिंपळ, पळस,साग,कडुलिंब, आवळा ह्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका वर्षाराणी पाटील यांचे सहयोगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे, योगेश गायकवाड, पोलीस हवालदार राम मदने, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला प्रमुख अर्चना घाळी, अॅड. विद्या शिंदे, सुवर्णा भोयणे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, विभागीय अध्यक्ष नाना कुंबरे, विशाल शेवाळे, संतोष चव्हाण,अमोल कानू,सतीश देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे म्हणाल्या,” आषाढी वारी मध्ये हरित वारी संकल्पना नक्कीच कौतुकास्पद आहे. गेल्या 19 वर्षांपासून संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “हरित वारी” मध्ये खंड पडला नाही. ही आपल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. कोरोना काळात रुग्णांसाठी “ऑक्सिजन” ची मोठी टंचाई निर्माण झाली होती. नैसर्गिक ऑक्सिजनच्या निर्मितीमध्ये वृक्षांचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करणे हे सार्वजनिक संस्था व शासन यांची संयुक्तिक कर्तव्य आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “पालख्यांमध्ये राज्यभरातून लाखो वारकरी 700 पेक्षा जास्त दिड्यांच्या माध्यमातून सहभागी होत असतात. हा वैष्णवांचा मेळावा अभिनव आनंद देणारा ठरत असतो. या बरोबरच आपल्या शहरात पर्यावरण संवर्धन होण्यासाठी हरित वारीचा उपक्रम ही राबविण्यात येत असतो. देशी वृक्षांची लागवड हा प्रमुख उद्देश आहे. वड, पिंपळ ह्या महावृक्षांमुळे वातावरणात ऑक्सिजनची पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होत असते. याकरिता आषाढी वारीमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.












































