शहर अभियंतापदासाठी मकरंद निकम यांना अधिक संधी

0
172

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदासाठी सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे आणि राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्यात रस्सीखेच आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार मकरंद निकम प्रबळ दावेदार असून त्यांची  शहर अभियंता पदावर निवड होण्याची दाट शक्यता आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भालकर यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्यांना या पदावर नियुक्त केल्यास मोठा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मकरंद निकम यांनी सर्वाधिक संधी असल्याचे सुत्रांनी सांगितले.

शहर अभियंता राजन पाटील 31 मे 2022 रोजी महापालिका सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यापूर्वीच नवीन शहर अभियंत्याची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने गुरुवारी (दि.26) पदोन्नती समितीची बैठक आयोजित केली आहे. महापालिकेतील सह शहर अभियंता मकरंद निकम, अभियंता श्रीकांत सवणे हे शहर अभियंता पदासाठी पात्र आहेत. त्यात निकम यांची सेवाज्येष्ठता आहे.

तर, अशोक भालकर हे तीन वर्षांपूर्वी शासनाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. भालकर यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या सह शहर अभियंता पदाची जबाबदारी देण्यात आली. भालकर यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला आहे. तसेच त्यांना सह शहर अभियंता पदावरच पदोन्नती दिली जाण्याची शक्यता असून त्यांनीही प्रशासनाला तसे लेखी दिल्याची माहिती आहे. निकम आणि सवणे हे स्थानिक अधिकारी आहेत. निकम हे सवणे यांना ज्येष्ठ आहेत. त्यामुळे निकम यांची शहर अभियंतापदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. आता आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.