शहरातील रस्ते खोदाईच्या परवानगीसाठी मोबाईल अॅप  

0
589

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते खोदाई करण्यासाठी महापालिकेकडे रितसर परवानगी मागावी लागते. ही परवानगी देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन संगणकीय प्रणाली आणि मोबाईल अॅप विकसित केले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिला आहे. त्यासाठी २२ लाखांचा खर्च होणार आहे.

अनेक खासगी संस्थांकडून महापालिकेकडे खोदाई करण्यासाठी परवानगी मागितली जाते. महावितरण, पाणीपुरवठा, दूरसंचार विभाग, गॅस, सीसीटीव्ही, ड्रेनेज लाईन, इंटरनेट आदी कामासाठी शासकीय विभाग आणि खासगी संस्थांकडून खोदाई केली जाते. यासाठी महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला जातो.

मात्र, या प्रक्रियेला विलंब लागतो. ही बाब लक्षात घेऊन शहर अभियंत्यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर  ऑनलाईन संगणक प्रणाली आणि मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता.

त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने निविदा काढल्या होत्या. त्यानंतर टेक नाईन सर्व्हिसेससला काम देण्यात आले आहे. दरम्यान, मोबाईल अॅपमुळे खोदाई परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान होणार आहे. अशा प्रकारची सुविधा देशातील कोणत्याही महापालिकेत नाही, असे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळंकठ पोमण यांनी सांगितले.