शरद पवार यांनाही कर्माचा सिध्दांत लागू आहे, बरे !

0
833

थर्ड आय – अविनाश चिलेकर –
`कर्माचा सिध्दांत` हे हिरभाई ठक्कर यांचे छोटेखनी पुस्तक नुकतेच हाताळले. त्यात तुम्ही केलेल्या कर्माची फळे तुम्हाला याच जन्मात मिळतात, मग ते बरे असो वा वाईट असा सिध्दांत मांडला आहे. राजा असो वा रंक, काळ कोणालाही माफ करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजकराणातील एक मुरब्बी, धुरंधर, खंबीर तेल लावलेले पहिलवान. देशातील एक चतुरस्त्र राजकारणी. ५५ वर्षांच्या राजकीय जीवनात पराभव त्यांनी कधी पाहिलाच नाही. हे सगळे ठिक आहे, पण त्यांनी जे पेरले तेच उगवले असे म्हटले तर वावगे ठरू नये. सिंह म्हातारा झाला की कोल्हेसुध्दा त्याच्या अंगावर धावतात. आज तसेच पवार साहेबांचे झाले. साहेब समाजवादी, पुरोगामी विचारांचे. ते देवभोळे नाहीत, पण काही म्हणा हा कर्माचा सिध्दांत आता त्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो. सर्व काळाचा महिमा आहे.
 
लंडन मध्ये शिकलेला पार्थ पवार अपरिपक्व ?
वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलेल्या त्यांच्याच नातवाने (पार्थ पवार) राम मंदिरासाठी शुभेच्छा दिल्या. उध्दव ठाकरे आणि अजित पवार (पार्थचे पिताश्री) यांचे आघाडी सरकार सुशांत सिंह राजपुत प्रकरणात सीबीआय चौकशीला तयार नसताना अगदी विरोधात भूमिका घेत थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी पार्थने केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं काम तो सांभाळतो. खुद्दा आजोबांनी (शरद पवार) नाही नाही म्हणत घर फुटायला लागले तेव्हा उमेदवारी दिली म्हणून मावळातून लोकसभा निवडणुक लढवली आणि पाच लाख मते घेतली. तोच पार्थ आता साहेबांच्या दृष्टीने इमॅच्युअर म्हणजेच अपरिपक्व ठरला.  “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, तो मॅच्युअर नाही“, असे शरद पवार यांना सांगाव लागतं. किती दुदैव आहे पहा.
 
ज्यांची घरे फोडली ते आज महाभारत पाहतात –
आयुष्यात भल्या भल्यांना पाणी पाजणारे पवार साहेब आज किती हतबल झालेत ते दिसले. त्यांनी केलेली कर्मच त्यांना आता उतार वयात त्याना आरसा दाखवतात. लोकांना ते खुळे समजतात. पार्थ अपरिपक्व होता तर त्याला मावळातून उमेदवारी का दिली हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा. खरे तर, आता साहेबांची अवस्था धरल तर चावतय सोडले तर पळतय अशी झाली आहे. एका रात्रीत अजित पवार भाजपच्या मागे जातात, ३० आमदार माझ्या बरोबर आहे सांगतात आणि भल्या पहाटे राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. तो प्रसंग लोक विसरलेले नाहीत. त्या घडामोडीत पवार यांची कन्या खासदार सुप्रियाताईंनी केलेले ट्विट त्यांच्या डोळ्यातले पाणी लोक विसरलेले नाहीत. आजवर राजकारणात कोणाकोणाच्या घरात साप सोडले, घर फोडली ते आठवा. दुसऱ्याचे घर जाळून तापल्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेतली, राजकीय स्वार्थ साधला. मुंडे, मोहिते, निंबाळकर, देशमुख, क्षिरसागर अशी शेकडो नावे घेता येतील. ज्यांचे ज्यांचे घर पवार यांच्या राजकारणामुळे फुटले ते सगळे आज पवार यांच्या एकत्र कुटुंबातील महाभारत (टिव्हीवर नव्हे प्रत्यक्षात) पाहतात. हा सर्व काळाचा महिमा आहे. याची देही याची जन्मा, उधारी नाही साहेब.

अजित पवारांच्या मनातील बोलत आहेत पार्थ ?
पार्थ यांच्या या वागण्याचा थेट संबंध अजित पवार यांच्या नाराजीशी असल्याचं राजकीय विश्लेषण केले जाते. पार्थ पवार यांच्या भूमिका म्हणजे जे अजित पवारांना जाहीरपणे बोलता येत नाही ते पार्थ बोलत आहेत. अजित पवार यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 2004 मध्येही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद सोडलं होतं त्यावेळीही अजित पवार नाराज होते. गेल्या वर्षभरातही त्यांनी नाराजीचे संकेत अनेकदा दिलेत. पार्थ पवार यांनी राम मंदिर सारख्या राष्ट्रीय विषयावरही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. आताही सुशांत सिंहच्या प्रकरणातही ते महाविकासआघाडीच्या विपरित मागणी करत आहेत. पक्षातल्या इतर कुणी कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने अशी भूमिका घेतली असती तर त्याच्यावर पक्षद्रोहाची कारवाई झाली असती. पण पार्थवर अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही. त्याचं काय कारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व टीकवण्यासाठी शरद पवार यांना सत्तेची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असण्याचीही दाट शक्यता आहे. कदाचीत मुहूर्त ठरलेला नाही.

भाजपसोबत जाण्यावरून पवार कुटुंबातच मतभेद आहेत, मात्र त्यांना त्याचे वावडे नाही. भाजप अस्पृष्य नाही, असे विधान मागे काकांनीच केले होते. आता पुतण्या आणि नातू थेट सोयरिकच करतो इतकेच. त्यामुळे पार्थ आणि अजित पवार हे वेगळे समजण्यात अर्थ नाही.

शरद पवारांची हतबलता ?
महाराष्ट्राच्या प्रत्येक गावचा सात बारा पवार साहेबांच्या डोक्यात असतो. प्रत्येकाची कुंडली ते ठेवतात. योग्यवेळी ती बाहेर काढतात आणि त्यातले गृह तारेही ते बदलतात. तमाम गावगुंडांचे गृह त्यांनी बदलले आणि त्यांच्या कुंडलीत राजयोग आणलेत. तेच डावपेच पुढे त्यांचे सख्खे पुतणे अजित पवार यांनी दोन पावले पुढे जाऊन केले. काकांचा किस्सा गिरवला. बाप सवाई (इथे काका सवाई) बेटा हे अजितदादांनी दाखवून दिले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, पण आरोप करणाऱ्या भाजपच्याच मदतीने दादांनी तो निकालात काढला. काकांवरही एन्रॉन , भूखंड घोटाळा, कुख्यात दाऊदच्या संबंधा पासून असंख्य आरोप झाले होते, पण त्यांनी ते कसे निकाली केले हे लोकांना ज्ञात आहे. अजित पवार यांनी त्याच पावलावर पाऊल टाकत बेधडक राजकारण केले आणि करत आहेत. इथे न्याय, निती, तत्व, पद, प्रतिष्ठा याचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादीने त्याला केव्हाच तिलांजली दिली आहे. विचारांची लढाई वगैरे सब छुट, इथे निव्वळ अर्थकारण, राकराणाची लढाई आहे. प्रेमात आणि युध्दात सर्व माफ असते तेच तत्व दादांचे आणि पार्थ पवार यांचे आहे. हा संघर्ष एका कुटुंबापूरता होता, चार भिंतीत होता. आता तो चव्हाट्यावर आला आणि आगामी काळात तो जगजाहीर होईल. शरद पवार आणखी किती हतबलता होतात तेच लोक पाहतात.

हिंदुत्वाचे राजकारण पवार यांच्या मुळावर –
पार्थ पवार अपरिपक्व असले तरी राजकारणात कुणीच परिपक्व किंवा अपरिपक्व नसतं. पार्थ हे त्यांचे वडील अजित पवार यांच्याशी न बोलता असं बोलले असतील का? हा प्रश्न आहेच. त्यामुळे शरद पवार अप्रत्यक्षरित्या अजित पवारांनाच पार्थची समजूत काढण्यास सांगत असावेत. आपण महाराष्ट्राचे राजकारण समजून घेतलं पाहीजे. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य असलेले दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदुत्ववादाचा ट्रेंड आलाय असं म्हणायला हरकत नसावी. सुरुवातीला विजयसिंह मोहीते-पाटील आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह-मोहीते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील आणि साताऱ्यातून शिवेंद्रराजे या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता पवार घराण्याची बारी आहे. पार्थ पवार यांनी राम मंदिराविषयी पत्रक काढून ‘जय श्री राम’चा नारा दिला यावर आक्षेप घेतला जात असला तरी आपण हे विसरता कामा नये की शरद पवारांनीही हिंदुत्ववादी शिवसेनेसोबतच सत्तास्थापन केली आहे. त्यांनीही कुठेतरी हिंदुत्ववादी पक्षासोबत तडजोड केली आहे. इथेही त्यांची हतबलता दिसून येते. कारण राष्ट्रवादीचे जहाज फुटले असते ते त्याना वाचवचे आहे. जातीयवादी म्हणून युतीला हिणवले गेले आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी तत्व खूंटीला अडकवले. याचे उत्तर काळ आहे.
खरा वारस पार्थ की रोहीत  –
लोकसभा निवडणुकीवेळी पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र पार्थ यांची उमेदवारी घोषित करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. त्याआधी शरद पवार माढ्यामधून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. ‘पण एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये, म्हणून मीच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला,’ असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. पण त्यावरून पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे पवारांच्या घरात राजकीय सत्तासंघर्ष सुरू होणार का, असा प्रश्न पुढे आला होता. तिथे आग विझली, पण तो निखारा, ती धग कायम आहे. पार्थ पवार यांच्या रुपानं पवार घराण्यातली तिसरी पीढी राजकारणात आली. आजोबांनी सगळे वजन जवळपास दुसरे नातू रोहीत पवार यांच्या पारड्यात टाकले. तिथेच ठिणगी पडली आता त्याचा वणवा होऊ पाहतोय. पार्थ ची ‘ती’ (पब) प्रतिमा त्याला साथ देत नाही आणि दुसरीकडे रोहीत पवार एक एक गड सर करत चालला. साहेबाचा वारस सुप्रिया की अजितदादा हा विषय अजून एरणीवर आलेला नाही. पुर्वी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांच्या पासून फोडले. जयदत्त क्षिरसागर यांच्या घरातून त्यांच्या पुतण्याला फोडले. त्यावेळी त्या कुटुंबाचा किती तळतळाट झाला असेल. आज तेच सगळे बारामतीच्या पटावर दिसते. काळ कोणालाही माफ करत नाही. काळ सूड उगवतो. सगळा कर्माचा सिध्दांत आहे तो शरद पवार यानाही लागू आहे.