शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस

0
373

– भाजपाच्या अनेक नेत्यांना पवार यांच्याबद्दल काळजी वाटू लागल्याने शिवसेनेतही अस्वस्थता

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – कालपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना शरद पवार यांची अचानक इतकी काळजी का वाटू लागली, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. शरद पवार यांना राजकारणातील सर्वपक्षीय नेते मानत असले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भाजप आणि राष्ट्रवादीतील जवळकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्या तब्बेतीबद्दल फोनवर विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. पाठोपाठ केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचाही फोन झाला, तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही पवार यांच्यासाठी प्रार्थना केल्याने राजकीय गोटात आता नवीन समिकरणाची चर्चा रंगली असून शिवसेनेच्या वर्तुळात काहीशी अस्वस्थता वाढली आहे.

‘शरद पवार आणि अमित शाहांच्या कथित भेटीने राजकारणाचे संदर्भ बदलले’ –
शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणाचा पट नव्याने मांडला जाणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा नेत्यांना शरद पवार यांच्या बद्दल विशेष काळजी वाटू लागली याचेच सर्वाने आश्चर्य आहे. अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात देशमुख यांना वाचविण्यासाठी स्वतः पवार यांनी अटोकाट प्रयत्न केले. त्यावर भाजपा तुटून पडली होती. सरकार बरखास्ती पर्यंत मागणी झाली. शिवेसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही घटक पक्षांना भाजपाने अगदी पध्दतशीर जाळ्यात अडकवले. आता दोन्ही पक्ष एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवेसनेतील अंतर वाढत चालले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपा अधिकाधिक जवळ येत चालले आहेत. कोरोनाच्या निमित्ताने लॉकडाऊन करावा की नाही या मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपाच्या सुरात सूर मिसळत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची कोंडी कऱण्याता प्रयत्न केली आहे.

शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील संदर्भ अचानक बदलले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार आपल्या ट्विटर हँडलवरून प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानत आहेत. मात्र, अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीविषयी त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जवळीक निर्माण झाली आहे का, असा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आगामी महापालिका निवडणुका महाआघाडी म्हणून लढणार असल्याचे शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले होते. आता त्या निर्णयालाही सुरूंग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. सहा महिन्यांत होणाऱ्या विविध सहा महिपालिका निवडणुकापूर्वीच नवनी सरकार सत्तेत आलेले दिसेल अशीही शक्यता वर्तविण्यात येते आहे.