शरद पवार यांचा पाच तास जबाब

0
544

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवला. यावेळी आयोगाने त्यांना विचारले की, जर कोणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल आणि कोणी असामाजिक घटक येऊन तिथे तणाव निर्माण करत असतील तर त्याची जबाबदारी कोणाची आहे?, यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. असामाजिक घटकांनी राज्याची शांतता भंग करू नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.”

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांना चौकशी आयोगाने बोलावायला हवं का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, “आयोग स्वतःहून तपास करण्यास स्वतंत्र आहे. भविष्यात अशी दंगलसदृश परिस्थिती टाळण्यासाठी लोकांकडून सूचना मिळू शकतात, असे आयोगाला वाटत असेल, तर ते कोणालाही बोलावू शकतात.”