शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे टीकास्त्र

0
345

पंढरपूर, दि. २४ (पीसीबी) : भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. “शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात, गोपीचंद पडळकर यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी आषाढीची पूजा करु नये – पडळकर
सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात जर बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करु नये. सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा, असंही यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?
धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली होती. ‘वंचित’कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता.त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेला संधी दिली.