व्याजाच्या बदल्यात महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; दोघांना अटक

0
359

तळेगाव दाभाडे, दि. १० (पीसीबी) – व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केले. तसेच मोबाईलमध्ये चित्रिकरण करून महिलेला ब्लॅकमेल केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मार्च ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत सोमाटणे, दिल्ली पठाणकोट, अमृतसर, सुरत गुजरात येथे घडली.

किरण रंभाजी घारे (वय 40, रा. बेबडओहळ, ता. मावळ), दीपक प्रकाशचंद्र ओसवाल (वय 46, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित 26 वर्षीय महिलेने याप्रकरणी सोमवारी (दि. 9) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घारे याच्याकडून फिर्यादी महिलेने एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात त्याला 50 हजार रुपयांचे दोन चेक दिले होते. परंतु आरोपीने व्याजाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली. त्याला फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने फिर्यादीचा नवरा व मुलगा यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीने फिर्यादीला कारमध्ये बसवून पिस्तुलाचा धाक दाखवून दिल्ली, पठाणकोट, अमृतसर व सुरत गुजरात येथे घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून फिर्यादीला ब्लॅकमेल करून वारंवार लैंगिक अत्याचार केले. माझ्या विरुद्ध तू कुठेही तक्रार द्यायला गेली तरी कोणीही माझे काही वाकडे करू शकत नाही, असे आरोपी हा फिर्यादीला म्हणाला. तुमच्या घरी बायका पाठवतो तेव्हा तुम्ही पैसे द्याल, अशी धमकीही आरोपीने दिली.

आरोपी घारे हा गुंड प्रवृत्तीचा असून तो फिर्यादीच्या परिस्थितीचा फायदा घेईल हे माहीत असतानाही त्याची चांगली व्यक्ती म्हणून आरोपी ओसवाल याने फिर्यादीशी आरोपी घारे याची ओळख करून दिली. यातून आरोपी ओसवाल याने फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.