वृद्ध वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च न करता वडिलांच्या नावावरील घराचे बक्षीसपत्र जबरदस्तीने लिहून घेणा-या मुलावर गुन्हा दाखल

0
351

रावेत, दि. २४ (पीसीबी) – वडिलांच्या नावावरील घर मुलाने जबरदस्तीने बक्षिसपत्र बनवून घेतले. त्यानंतर वडील पूर्णपणे मुलावर अवलंबून असताना त्यांच्या औषधोपचाराचा खर्च न करता मुलाने वडिलांना वारंवार धमकी दिली. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यास मुलाने नकार दिला. याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 मार्च 2017 ते 23 मार्च 2022 या कालावधीत शिंदेवस्ती, रावेत येथे घडला.

शांतीलाल गोविंदलाल खत्री (वय 77, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी रावेत चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा प्रशांत शांतीलाल खत्री (वय 43) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून सन 2017 साली वल्लभनगर पिंपरी येथील घर जबरदस्तीने व दडपणाखाली दस्त करून बक्षीसपत्र तयार करून स्वतःकडे घेतले. ते घर भाड्याने देऊन त्याचे भाडे स्वतः घेतले. फिर्यादी हे आरोपी मुलावर पूर्णपणे अवलंबून असताना त्यांना मुलाने वेळोवेळी दमदाटी, जीवे मारण्याची धमकी दिली. वृद्ध वडिलांच्या औषधोपचाराचा, दवाखान्याचा खर्च आरोपी मुलाने केला नाही. सुखसोयी, भौतिक गरजा पुरवण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.