“विसंगतीतून विनोद निर्मिती होते!” – श्रीकांत चौगुले, वासंतिक व्याख्यानमाला – पुष्प पहिले

0
190

पिंपरी, दि. ६ (पीसीबी ) “विसंगतीतून विनोद निर्मिती होते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक ०५ मे २०२३ रोजी केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘कार्यक्रमातल्या गमतीजमती’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना चौगुले बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना राजाभाऊ गोलांडे यांनी आपल्या मनोगतातून, “तालमीच्या आखाड्यातले डाव शिकत असतानाच राजकारणातील डावसुद्धा शिकलो. उत्तम निरीक्षण असेल तर सहज विनोद सुचतो!” असे मत व्यक्त केले.

श्रीकांत चौगुले पुढे म्हणाले की, “तालमीचे गाव असा लौकिक असलेल्या ठिकाणी मनाची मशागत घडते आहे, हा उत्तम योग आहे. जुन्या विचारांची गळती व्हावी अन् नवविचारांची पालवी फुटावी हे वसंत ऋतूतील वासंतिक व्याख्यानमालेचे फलित असते.

साहित्यिक, कलाकार ही सर्जनांच्या क्षणांव्यतिरिक्त सामान्य माणसेच असतात. साहजिकच त्यांच्याही बोलण्यात, वागण्यात विसंगती असते. त्यामुळे अनावधानाने, नकळत विनोद घडत असतात. अतिउत्साह, धांदरटपणा, आचरणातील विक्षिप्तपणा यामुळे हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते; परंतु अनेकदा त्या व्यक्तीच्या ते लक्षातही येत नाही!” नवोदित सूत्रसंचालकाच्या शाब्दिक आतषबाजीतून होणारा अर्थाचा अनर्थ, संयोजकांच्या ढिसाळपणामुळे चांगल्या कार्यक्रमाचा झालेला विचका; तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देताना घडणाऱ्या अतिशयोक्ती, घरोघरी टीव्ही मालिकांतील आभासी जगामध्ये रमण्याची महिलांची सवय अन् त्यामुळे आलेल्या अतिथीची पंचाईत, असे प्रासंगिक विनोदाचे विविध किस्से कथन करून श्रीकांत चौगुले यांनी श्रोत्यांना खळखळून हसवले.

रत्नप्रभा खोत आणि मंगला दळवी यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून, “सातत्याने सत्तावीस वर्षे वासंतिक व्याख्यानमालेच्या माध्यमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा उद्देश आजपर्यंत सफल झाला आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.‌ ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीने संयोजनात सहकार्य केले. राजाराम गावडे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी आभार मानले.