विवाह समारंभावरून घरी परतत असलेल्या पती-पत्नीला कारची धडक; दोघे गंभीर जखमी

0
317

मोशी, दि.१७ (पीसीबी)  नातेवाईकाच्या विवाह समारंभावरून घरी परतत असलेल्या एका दुचाकीस्वार दाम्पत्याला कारने जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर बनकरवस्ती, मोशी येथे घडली.

बाळासाहेब बाबुराव टेकाळे (वय 52) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. कल्पना बाळासाहेब टेकाळे (वय 43, रा. बनकरवस्ती, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, च-होली येथील एका मंगल कार्यालयात सोमवारी फिर्यादी यांच्या नातेवाईकाचा विवाह समारंभ होता. त्या विवाहासाठी फिर्यादी कल्पना आणि त्यांचे पती बाळासाहेब दोघेजण दुचाकीवरून (एम एच 14 / एफ डब्ल्यू 4967) गेले. विवाह समारंभावरून रात्री घरी परत येत असताना बनकरवस्ती मोशी येथे महामार्गावर एका कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे पती रस्त्यावर पडले. पती बाळासाहेब जागेवर बेशुद्ध झाले. तर फिर्यादी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर आरोपी कारचालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला. फिर्यादी यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फिर्यादी कल्पना आणि त्यांचे पती बाळासाहेब यांच्यावर मोशी येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.