“विधीमंडळात विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल”

0
518

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – “विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल,” असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी केले आहे. महाष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. मात्र त्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी विश्वासदर्शक ठरावामध्ये सरकार पडले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करु शकते असं मत व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी ५०-५० चे सूत्र वापरण्याची भूमिका शिवसेनेने घेत मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याची मागणी केली आहे. यावरुनच आता भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का या विषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आज मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मलिक यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर नवीन समिकरणांच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यतेचा राष्ट्रवादी विचार करेल असे म्हटले आहे. “भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही विरोधीपक्षाच्या भूमिकेत बसण्याची तयारीत आहोत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता स्थापन करावी. विधीमंडळाच्या पटलावर विश्वासदर्शक ठरावामध्ये शिवसेनेने भाजपाविरोधी भूमिका घेतली आणि सरकार पडले तर राष्ट्रवादी पर्याय सरकारचा विचार नक्कीच करेल,” असं मलिक म्हणाले आहेत. विधानसभा निडवणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी मुसंडी मारली असून ५४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने ५० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाची मागणी करणाऱ्या शिवसेनेला दोन्ही काँग्रेस काही ऑफर देऊन सत्ता स्थापन करणार की शिवसेना आणि भाजपा चर्चेने प्रश्न सोडवून युतीचे सरकार सत्तेत आणणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.