विधानसभेच्या जागा वाटपाबाबत शिवसेना आणि भाजपचा सावध पवित्रा; अनेक मतदारसंघांबाबत पेच

0
357

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १२३, तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती नसल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांचे उमेदवार पाडले होते. यात दोन्ही पक्षांतील नेतृत्वाच्या जवळ असलेले उमेदवारही पडले आहेत. मात्र पडलेल्या या उमेदवारांसाठी पुन्हा मतदारसंघ पदरात पाडून घेण्याचा आग्रह दोन्ही पक्षांना परवडणारा नसल्याचे भाजप आणि शिवसेना नेतृत्वाच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे युतीमध्ये ज्यांनी जे मतदारसंघ जिंकले आहेत ते मतदारसंघ त्यांच्याकडे कायम राहावेत, अशी भूमिका युतीच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते.

भाजपने १२३ जागा जिंकल्या असून त्यांच्या सरकारला १० अपक्षांचा पाठिंबा होता. यावेळी या अपक्षांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची भाजपमध्ये रणनीती ठरल्याचे कळते. त्यामुळे १४४ पैकी जवळपास १३३ विधानसभा मतदासंघ त्यांचे निश्चित ठरले आहेत. दोन्ही पक्षांनी मित्रपक्षांना प्रत्येकी चार जागा सोडाव्यात, असे प्राथमिक चर्चेत ठरल्याचे समजते. याआधी ठरलेल्या २० जागांऐवजी मित्रपक्षांना फार तर आठ जागा द्याव्यात आणि उरलेल्या २८० जागा निम्म्या-निम्म्या वाटून घ्याव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले. अशावेळी भाजपने त्यांच्या कोट्यातील शिल्लक राहिलेल्या आठ ते दहा जागा निश्चित केल्यास त्यांच्या जागावाटपाचा कोटा पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांनी या जागा लवकरात लवकर निश्चित करून त्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेकडे दिल्यास जागावाटपाच्या फॉर्म्युल्याला अंतिम स्वरुप देता येईल, असे शिवसेनेकडून भाजपला कळविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यावेळी या प्रस्तावाची त्यांना माहिती देण्यात आल्याचे समजते.

भाजपच्या प्रस्तावाला विलंब

काँग्रेस व राष्ट्रवादीकडून काही आमदार भाजपमध्ये येण्याबाबतची बोलणी अंमित स्वरुपात असून त्यांच्या प्रवेशानंतर संबंधित विद्यमान आमदार वा नेते ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असतील ते मतदारसंघ भाजपकडून निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत या संबंधितांचा पक्षप्रवेश होणार नाही तोवर आमच्या कोट्यातील शिल्लक जागेनुसार आमचे कोणते मतदारसंघ असतील हे आताच ठरविणे कठीण आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेला जो प्रस्ताव जाईल, तो या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतरच दिला जाईल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. शिवाय मित्रपक्षांना आठऐवजी किमान १५ ते २० जागा द्याव्यात, अशी भूमिका भाजपच्या राज्यातील नेतृत्वाची असल्याचे कळते.

…तर जागावाटपाला खीळ?

वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना सोडल्यानंतर ते सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. कोळंबकर यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले असून विधानसभेला त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो. शिवसेना नेतृत्वाने हा मतदारसंघ भाजपला सोडण्याविषयी असमर्थता व्यक्त केल्याचे कळते. त्यामुळे वडाळा मतदारसंघाविषयी पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अशाचप्रकारे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबत आघाडीमधून भाजपमध्ये येणाऱ्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघावरून पेच निर्माण झाल्यास युतीतील एकूणच जागावाटपाला खीळ बसेल, अशी शक्यता शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.