विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात गुरूवारी मतदान

0
399

नागपूर, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांमध्ये गुरूवारी (दि. ११) मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह नाना पटोले, भावना गवळी आदी उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरूवारी मतदान पेटीत बंद होणार आहे.  पहिल्या टप्प्यात देशातील लोकसभेच्या ९१ जागांबरोबरच आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओदिशा या राज्यांत विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणमधील लोकसभेच्या सर्व १७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.  उत्तराखंडमधील पाच, बिहारमधील चार, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, मेघालय, अरूणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन आणि मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालॅन्ड, सिक्कीम, अंदमान-निकोबार येथील प्रत्येकी एका जागेसाठी गुरुवारी मतदान होणार आहे.

गडचिरोली, गोंदियात ५०० मतदान केंद्रे संवेदनशील

छत्तीसगडमधील नक्षली कारवायांमुळे महाराष्ट्रातही नक्षलग्रस्त भागांत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील ५०० हून अधिक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली. गडचिरोली- चिमूर मतदारसंघातील आमगाव, आलमोरी, अहेरी आदी भागांत तसेच भंडारा- गोंदिया मतदारसंघातील अर्जुनी, मोरगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत तर उर्वरित ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल.

दिग्गजांच्या प्रचारसभा

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा, गोंदिया, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ, रामटेक मतदारसंघात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती व गोंदिया मतदारसंघात, बसपच्या प्रमुख मायावती यांनी नागपूरमध्ये तर वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरसह पूर्व विदर्भात सभा घेतल्या. यासोबतच केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, रामदास आठवले, पीयूष गोयल, राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा झाल्या.