विंडीजची झुंज अपयशी, न्यूझीलंडचा डावाने विजय

0
228

वेलिंग्टन,दि.१४(पीसीबी) – कर्णधार जेसन होल्डर आणि यष्टिरक्षक फलंदाज डा सिल्वा यांची झुंज अखेर तोकडी पडली. न्यूझीलंडने त्यांचा दुसरा डाव ३१७ धावांवर गुंडाळत दुसरी कसोटी १ डाव १२ धावांनी जिंकली. दुसऱ्या कसोटीसह न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

न्यूझीलंड या विजयाने कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आले असून, आघाडीवर असणाऱ्या ऑस्ट्रेलियापेक्षा ते थोड्याशा फरकाने मागे आहेत. ऑस्ट्रेलियाचे ११६.४६१ मानांकन गुण आहेत, न्यूझीलंडचे ११६.३७५ गुण झाले आहेत. इंग्लंड तिसऱ्या स्थानावर घसरले असून, आता ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडने या विजयाने मायदेशातील सलग १५वा कसोटी विजय मिळविला.

घरच्या वातावरणात आम्ही गेले दोन आठवडे चांगले क्रिकेट खेळत आहोत. बदली कर्णधार म्हणून विजयाचा साक्षीदार ठरलो खूप आनंद वाटत आहे. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूने योगदान दिले.
टॉम लॅथम, न्यूझीलंडचा कर्णधार

विल्यम्सनच्या गैरहजेरीत शानदार १७४ धावांची शतकी खेळी करून न्यूझीलंडचे आव्हान भक्कम करणारा हेन्री निकोल्स सामन्याचा मानकरी ठरला. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ गडी बाद करणारा काईल जेमिसन मालिकेचा मानकरी ठरला.

वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी ६ बाद २४४ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केली. होल्डर आणि सिल्वा ही नाबाद जोडी आज फारसा चमत्कार दाखवू शकली नाही. आणखी ८५ धावांची भर घालून विंडीजचा दुसरा डाव ३१७ धावांवर आटोपला. होल्डर आपल्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ एका धावेची भर घालून बाद झाला. त्यानंतर अल्झारी जोसेफ याने सहा चौकारांसह २४ धावांची वेगवान खेळी केली. पण, ती केवळ धडपड होती. टीम साऊदीने दोघांना बाद केले. या दरम्यान डा सिल्वा याने आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटी पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा डा सिल्वा विंडीजचा सहावा यष्टिरक्षक ठरला.