वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईतांना अटक

0
283

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी) – वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा एक आणि वाहन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

अनिकेत तुकाराम पवार (वय १९, रा. माण, ता. मुळशी), अक्षय विलास नागरे (वय १९, रा. माण, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरी आणि जबरी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्यानुसार हिंजवडी पोलिसांचा तपास सुरु होता. हिंजवडी तपास पथकातील पोलीस गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, मागील महिन्यात झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित तरुण हिंजवडी फेज दोन येथे थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अनिकेत आणि अक्षय या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी परिसरातून पाच दुचाकी आणि दोन मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहायक फौजदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, पोलीस अंमलदार बापू धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, नरेश बलसाने यांच्या पथकाने केली.