वाघोली येथे स्टोन मेटल कारखान्यात ३० लाखांची वीजचोरी उघड; गुन्हा दाखल

0
368

पुणे, दि. ६ (पीसीबी) : वाघोलीमधील भावडी येथील श्री गणेश स्टोन मेटल या कारखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेली तब्बल ३० लाख ६३ हजार रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. वीजचोरीच्या रकमेसोबतच या कारखान्याला आणखी सुमारे ३५ लाख रुपये दंडाची रक्कम सुद्धा भरावी लागणार आहे. वीजचोरी प्रकरणी कारखान्याच्या संचालकाविरुद्ध मंगळवारी (दि. ५) लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुळशी विभाग अंतर्गत वाघोलीमधील भावडी येथे श्री गणेश स्टोन मेटल या कारखान्याला महावितरणकडून उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. मात्र या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्यामुळे वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यामध्ये वीजमीटरला लावलेले सील, फेरफार करण्यासाठी तोडलेले दिसून आले. सोबतच आर-फेजमध्ये लूप टाकून करंट ट्रान्सफॉर्मर बायपास करण्यात आल्याचे देखील आढळून आले. त्यामुळे वीजमीटरमधील रिडींगची गती संथ झाली. परिणामी मीटरमधील रिडींग हे प्रत्यक्ष वापरलेल्या विजेपेक्षा कमी येत होते. ही बाब महावितरणच्या तपासणीमध्ये स्पष्ट होताच वीजचोरीचा तात्काळ पंचनामा करण्यात आला. यात गेल्या सहा महिन्यांपासून ९४ हजार २१० युनिटची म्हणजे ३० लाख ६३ हजार १०० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले.

ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रमोद बाबरेकर व श्री. अनिल चौधरी, उपकार्यकारी अभियंता विजय जाधव, सहायक अभियंता अंकुश मोरे व रेश्मा गुरव, मुख्य तंत्रज्ञ शिवाजी पाडवी आदींनी योगदान दिले. वीजचोरी प्रकरणी श्री गणेश स्टोन मेटल कारखान्याचे संचालक सागर सिताराम फुलसुंदर विरुद्ध मंगळवारी (दि. ५) लोणीकंद पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.