वरिष्ठांच्या परस्पर कारचे पैसे घेऊन सेल्स कन्सलटंटने केली शोरूमची फसवणूक

0
275

हिंजवडी, दि. १४ (पीसीबी) : कारच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या कन्सलटंटने वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ग्राहकाकडून पैसे स्वीकारून त्याचा अपहार केला. तसेच गाडीची परस्पर ग्राहकाला डिलिव्हरी देत फसवणूक केली. हा प्रकार 21 जुलै ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत बी यु भंडारी शोरूम, वाकड येथे घडला.

राहुल दत्तात्रय खांदवे (वय 47, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरीष विजय भालशंकर (वय 32, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिरीष हा वाकड येथील बी यु भंडारी शोरूम मध्ये सेल्स कन्सलटंट म्हणून काम करतो. त्याने कंपनीच्या ग्राहकाला एमजी ग्लोस्टर ही कार विकली. त्याचे 43 लाख 24 हजार रुपये ग्राहकाने दिले. उर्वरित चार लाख ८४ हजार 191 रुपये ग्राहकाकडे राहिले होते. शोरूमच्या वतीने फिर्यादी राहुल खांदवे यांनी ग्राहकाकडे विचारणा केली असता ग्राहकाकडून शिरीष याने पाच लाख रुपये रोख स्वरुपात घेतले असून त्यानंतर त्याने कारची डिलिव्हरी देखील दिली असल्याचे समजले. शिरीष याने ग्राहकाकडून घेतलेले पैसे स्वतः वापरून त्याची शोरूमला माहिती न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.