“वंचितांसाठी जीवन समर्पित करणाऱ्यांना समाज चिरकाल स्मरणात ठेवतो!” – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी….

0
495

पिंपरी,दि.२९ (पीसीबी) “वंचितांसाठी जीवन समर्पित करणाऱ्यांना समाज चिरकाल स्मरणात ठेवतो!” असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे काढले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटिझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना भगतसिंह कोश्यारी बोलत होते.

खासदार विनय सहस्रबुद्धे, महापौर उषा ढोरे, पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची व्यासपीठावर आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पिंपरी-चिंचवड महापालिका नगरसेवक यांची कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गिरीश प्रभुणे यांनी, “सुमारे पाच हजार वर्षांपासूनचा भारतीय संस्कृतीचा इतिहास प्रदर्शित करणारे कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यात येणार आहे, अशा माहिती दिली. सुमारे पंचेचाळीस हजार वर्षांपूर्वीचा भारतीय संस्कृतीचा शोध घेणे हा व्याख्यानमाला आणि कार्यशाळेचा मुख्य विषय आहे, असेही सांगितले. विनय सहस्रबुद्धे यांनी, “ज्ञानाच्या मार्गाने भटक्या विमुक्त जमातींना पुन्हा एकदा मुक्ती देऊन त्याला श्रमप्रतिष्ठेच्या संस्कारांची जोड दिल्यामुळे आत्मनिर्भर होण्याची ही वाटचाल आहे!” असे मत मांडले. भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, “गिरीश प्रभुणे यांनी पन्नास वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाचा आता वटवृक्ष झाला आहे. हा वटवृक्ष अजून मोठा व्हावा, अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथील विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील एक घटक समजावे, असे मी सर्वांना आवाहन करतो; कारण त्यामुळे आपल्याला हुतात्मा चापेकर बंधूंचे आशीर्वाद लाभतील!” उद्घाटन सत्राचा प्रारंभ आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले. ॲड. सतीश गोरडे यांनी आभार मानले.