लोकसभेसाठी भाजपची रणनीती; मोदींच्या २० राज्यांमध्ये  १०० सभा

0
606

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच लोकसभा निवडणुकीच्या वातावरण निमिर्तीसाठी मोदी देशातील २० राज्यांमध्ये  १०० सभा घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या  ५  राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याचा धसका भाजपने घेतल्याने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच जाहीर  सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.  

या जाहीर  सभांमधून  पंतप्रधान मोदी गेल्या  चार वर्षात  आपल्या  सरकारने केलेल्या  कामांचा लेखाजोखा जनतेपुढे  मांडणार आहेत. ३ जानेवारीरोजी पंजाबच्या जालंधर आणि गुरुदासपूरमध्ये रॅली काढून या सभांना सुरूवात केली जाणार आहे.  मोदींची नव्या वर्षातील ही  पहिलीच सभा असेल.  मात्र याकडे लोकसभेची तयारी म्हणूनच पाहिले जात आहे.

३ जानेवारीला पंजाब येथील गुरुदासपूर आणि जालंधर, ४ जानेवारीला  मणिपूर आणि आसाम,  ५ जानेवारीला झारखंड आणि ओदिशा, २२ जानेवारीला वाराणसी येथे  मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर मोदी २४ जानेवारीरोजी  प्रयागराज येथील कुंभमेळ्यात उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या सभांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, २०१४ मध्ये ज्या जागांवर भाजपचा पराभव झाला आहे,  त्या जागांवर विजय मिळवण्यास     भाजप प्रयत्नशील आहे. त्यासाठी मोदींच्या शंभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आता या सभांना कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मोदींच्या या रणनीतीला विरोधक कसे प्रत्युत्तर देणार ? याकडे सर्वांचे लक्ष असेल.