लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या तक्रारीसाठी “सी-व्हिजील” अॅप; नागरिकही करू शकतील तक्रार, नाव गुप्त राहणार

0
694

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत आता मतदारच थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकणार आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल (C-vigil) हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपवर मतदारांना आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार तर करता येईलच; याशिवाय फोटो, व्हिडिओही टाकता येणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडून पुराव्यांची खात्री करून केवळ १०० मिनिटांत कार्यवाही किंवा कारवाईचे स्टेटस तक्रारदारास कळवण्यात येणार आहे. या अॅपवर आलेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व संबंधित पथकास दोषींवर कारवाई करता येईल. तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर सर्वांसाठी उपलब्ध असेल.

निवडणूक कालावधीत मतदारांना पैसे किंवा वस्तू वाटपाचे पुरावे, नेत्यांची वादग्रस्त भाषणे या अॅपद्वारे रेकॉर्ड केली जाऊ शकतात. हे सर्व रेकॉर्डिंग व पुरावे निवडणूक आयोगाकडे कारवाईसाठी पाठवता येतील. विशेष म्हणजे एखाद्या पक्षाची जाहीर सभा, रॅली, बैठक वा नेत्याचे लाइव्ह भाषणही थेट अॅपशी जोडता येते. तक्रार थेट संबंधित निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तही पाहू शकतात.

जीपीएसने तक्रारदाराच्या ठिकाणाची खात्री होईल. तक्रारदाराला एक युनिक आयडी मिळेल. त्याद्वारे तो पुढे काय कारवाई झाली याची माहिती मिळवू शकेल. तक्रार दाखल झाल्यानंतर ती आधी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे जाईल. नंतर ती फील्ड युनिटकडे दिली जाईल. फोटो व व्हिडिओ शूट केल्यानंतर युजरला फक्त पाचच मिनिटांचा वेळ असेल. आधीच काढलेला किंवा फॉरवर्डेड व्हिडिओ-फोटो अपलोड करता येणार नाही. तसेच अॅपवरून काढलेला फोटो-व्हिडिओ मोबाइलच्या गॅलरीत सेव्ह होणार नाही.

कमाल २ मिनिटांचा व्हिडिओ

नागरिक अॅपवर आचारसंहिता भंगाचा फोटो किंवा जास्तीत जास्त दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवू शकतील. यात तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. तक्रारी व पुराव्यांची खातरजमा करून कारवाई केली जाऊ शकते. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून निःशुल्क डाऊनलोड करता येईल. अॅपसाठी कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस असलेला अँड्रॉइड स्मार्टफोन लागणार आहे. हे अॅप आचारसंहिता लागू झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत कार्यरत राहणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच या अॅपचा वापर होत आहे. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांतील निवडणुकीत सी-व्हिजिल अॅपचा वापर करण्यात आला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतही ते वापरण्यात आले होते. नागरिकांना जागरूक करणे हा अॅपचा उद्देश आहे. अॅपवर आचारसंहिता भंगाची तक्रार, त्याचे फोटो, व्हिडिओही अपलोड करता येतील. आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर सर्वांसाठी उपलब्ध असेल.