लष्करात भरती होण्यासाठी लेखी पेपर मिळवून देतो असे म्हणत केली लाखोंची फसवणूक

0
499

पुणे, दि. ०२ (पीसीबी) : लष्करात भरती होण्यासाठी लेखी पेपर मिळवून देतो, असे सांगून पैसे उकळल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटकही करण्यात आली आहे. किशोर महादेव गिरी (वय 40, रा. लकडे नगर, माळेगाव, बारामती) कुमार परदेशी (रा. फलटण, जि. सातारा), योगेश उर्फ गोट्या शंकर गोसावी (रा.माळेगाव, बारामती) आणि भरत ( पूर्ण नाव माहीत नाही) अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पुण्यात होणा-या आर्मी भरती परीक्षेचे पेपर फोडून ते परीक्षार्थींना पुरवणार असल्याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार इंटेलिजन्सने याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला दोघांना पकडले होते. चौकशीत त्यांनी अनेक तरुणांना परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फोडून देण्याचे सांगत लाखो रुपये घेतल्याची कबुली दिली. त्याशिवाय आरोपींनी अनेक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चार तपास करीत आहेत