लखीमपूर हिंसेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; ‘केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या’

0
436

मुंबई, दि.१० (पीसीबी) : लखीमपूर हिंसाप्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने लखीमपूर हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बंद पूर्वीच राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने उद्याचा बंद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. उद्याच्या बंदमध्ये जनता सहभागी होईल आणि केंद्राच्या जुल्मी कारवाईचा निषेध करेल. केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. मात्र, संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठी उभा आहे, असं सांगतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या प्रकरणात हात असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने त्यानंतर मिश्रा यांच्या मुलाला अटक झाली. गृहराज्यमंत्र्यांच्या गावात ही घटना घडली. त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले. त्यामुळे मिश्रा यांनी राजीनामा दिला पाहिजे. केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं मलिक म्हणाले.

यावेळी त्यांनी एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही काही प्रश्न उपस्थित केले. माझा मुद्दा हा आहे की 11 लोकं होती आणि एनसीबीने 3 लोकांना सोडलं. एनसीबी म्हणतेय 11 नाही, 14 लोकं होते. या सर्वांना रात्रभर एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. आम्ही सर्व फुटेज पाहिले. 13 लोक आहेत. 3 लोकं सोडल्यावर आम्ही हे फुटेज जाहीर केलं. आणखी तीन लोकांना सोडण्यात आले आहे. ते लोक कोण होते? त्यांची फुटेज जाहीर करा, असं आम्ही एनसीबीला आव्हान करतो. तुमच्या कार्यालयातून बाहेर पडतानाचे फुटेज जाहीर करा. भाजप नेत्यांच्या बोलण्यावर तीन लोकांना सोडण्यात आलं आहे. ही सर्व कारवाई हे फर्जीवाडा आहे, असं त्यांनी सांगितलं.

काल एनसीबीचे दिल्लीचे ग्यानेश्वर सिंग म्हणत होते की, आम्ही जागेवर पंचनामा करतो. गेल्या रविवारी साडे आठ वाजता एनसीबीने काही फोटो व्हायरल केले. त्या फोटोत एका खुर्चीवर सीझर आहे. हे फोटो त्यांनी क्राईम रिपोर्टरला पाठवले आहेत. त्याचबरोबर एनसीबीने चुकीने एक व्हिडीओही पाठवला आहे. हे सीझर हे जहाजावर नाही, टर्मिनलवर नाही तर समीर वानखेडेंच्या टेबलवरचे आहे. कर्टनही वानखेडेच्या कार्यालयातील आहे, हे त्या व्हिडीओ आणि फोटोतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे क्रुझची केस फर्जिवाडा आहे, असा माझा दावा आहे, असं मलिक म्हणाले. ज्यांच्यावर अन्याय झाला ते कोर्टात जातील, असंही त्यांनी सांगितलं.

काही लोकं मला 100 कोटींच्या नोटीसा पाठवणार आहेत. त्याची मी वाट पाहत आहे. बऱ्याच कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू असते. माझी ब्रँड व्हॅल्यू 100 कोटींची ठरवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावरही टीका केली. कंबोज म्हणाले मलिक हे भंगारवाला आहेत. होय, माझे वडील भंगारचा धंदा करायचे याचा अभिमान आहे. मी कधी कुणाला लुटले नाही. मी बँकेचे पैसे बुडवले नाही. ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पाडल्या ते माझ्या कुटुंबीयाचा धंदा काढत आहेत. मी भंगारचा धंदा करतो. पण आम्ही सोन्यात कुणाला बुडवले नाही, अशी टीका त्यांनी केली.