रेडझोनबाबत शिवसेनेच्या आढळराव पाटलांची नवी थाप; म्हणे दिवंगत मनोहर पर्रीकर घोषणा करणार होते…पण…

0
914

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – रेडझोनची हद्द कमी करण्याचा प्रश्न गेली १५ वर्षे न सुटल्याने शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या प्रश्नांवर थापा मारण्याचा आढळराव पाटील विक्रम करतील, असे चित्र आहे. रेडझोनचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर होता. परंतु, तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री केल्याने हा प्रश्न पुन्हा लटकला, अशी नवीन स्टोरी आढळराव पाटील यांनी बुधवारी (दि. ३) भोसरीत बोलताना सांगितली. त्यामुळे आढळराव पाटील रेडझोनच्या प्रश्नांवर आणखी किती वर्षे थापा मारणार आहेत?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

रेडझोनची हद्द म्हणजे लष्कराच्या संरक्षित क्षेत्राची मर्यादा कमी करणे हा भोसरी विधानसभा मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे. शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. रेडझोनचा प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत असल्यामुळे तो त्यांनीच सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु, तब्बल १५ वर्षे खासदार म्हणून मिरवत असताना आढळराव पाटील यांनी रेडझोनच्या प्रश्नांवर कायम थापा मारण्याचेच काम केल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न काही केल्या सुटत नसल्याने आढळराव पाटील यांनी प्रत्येकवेळी नवी थाप मारल्याचे नागरिकांच्या चांगलेच लक्षात आहे.

आता त्यांनी रेडझोनच्या प्रश्नाबाबत नवीन स्टोरी तयार करून ती नागरिकांना ऐकविली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजप नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एका मंगल कार्यालयात बुधवारी सायंकाळी मेळावा घेतला. या मेळाव्याला खासदार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना आढळराव पाटील यांनी रेडझोन प्रश्नांवरची नवीन स्टोरी उपस्थितांना ऐकवली.

मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षण मंत्री असताना रेडझोनची हद्द कमी करण्याची केवळ घोषणा होणे बाकी होती. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. परंतु, अचानक त्यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे रेडझोनचा प्रश्न पुन्हा लटकला. पर्रीकर हे आणखी काही दिवस संरक्षण मंत्रीपदावर राहिले असते, तर रेडझोनचा प्रश्न सुटला असता, अशी स्टोरी आढळराव पाटील यांनी सांगितली. संरक्षण खात्याने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली असती, तर पर्रीकर यांच्यानंतरच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी त्याची घोषणा का केली नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पर्रीकर हे जरी गोव्याचे मुख्यमंत्री झाले, तरी केंद्रात भाजप-शिवसेनेचेच सरकार होते. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन या भाजपच्याच आहेत. असे असताना आधीच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या सर्व तयारीवर निर्मला सीतारमन यांनी पाणी फेरले? असे आढळराव पाटील यांना सांगायचे आहे का?, असाही प्रश्न उपस्थित होतो. एकंदरीत काय तर रेडझोनच्या प्रश्नांवर खासदार आढळराव पाटील थापा मारण्याचा विक्रम करतील, असे दिसून येत आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांनी रेडझोनच्या प्रश्नांवर आणखी किती वर्षे अशाच थापा मारणार हे एकदाचे जाहीर करून टाकावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.