रॅपिड फायर पिस्तूलमध्ये युवा विजयवीर आणि तेजस्विनीला सुवर्णपदक

0
385

नवी दिल्ली,दि.२८(पीसीबी) – भारताच्या युवा विजयवीर सिद्धू आणि तेजस्विनी या जोडीने आज मिश्र सांघिक प्रकारात भारताला २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. येथील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारताच्याच गुरप्रीत सिंग-अभिज्ञा अशोक पाटिल यांचा एकतर्फी लढतीत ९-१ असा पराभव केला.

भारताचे हे स्पर्धेतील १३वे सुवर्णपदक ठरले. स्पर्धेचा एक दिवस शिल्लक असताना भारताने आतापर्यंत १३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ ब्रॉंझ अशी २७ पदके मिळविली आहेत. त्यांनी पदकतालिकेत अमेरिकेवर मोठी आघाडी घेतली आहे. अमेरिकेने आतापर्यंत ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ ब्रॉंझपदक पटकावले. इटली २ सुवर्ण, २ ब्रॉंझपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

आजच्या दुसऱ्या अंतिम सामन्यात अॅलेसिया लेझी आणि व्हॅलेरियो ग्राझिनी यांनी ट्रॅप प्रकारात मिश्र सांघिक सुवर्णपदक मिळवले. त्यांनी स्लोवाकियाच्या झुझाना रेहाक स्टेफिसीकोवा आणि आद्रियन ड्रोबनी जोडीचा ३९-३६ असा पराभव केला. पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर राहून ब्रॉंझपदकाच्या लढतीत खेळणाऱ्या भारताच्या श्रेयाशी सिंग आणि किनान चेनाई जोडीला तुर्कीच्या यावुझ इनाम आणि साफिये सारीटर्क जोडीकडून ३५-३८ असा पराभव पत्करावा लागला.

आता रविवारी अखेरच्या दिवशी तीन अंतिम लढती होती. यातील पहिली अंतिम लढत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल पुरुष सांघिक होईल. त्यानंतर शॉटगनच्या दोन अंतिम लढती होतील.