रिक्षातून प्रवास करताय, अशा महिला चोरांपासून सावधान…

0
354

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पतीसोबत रिक्षाने प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्समधून दोन अनोळखी महिलांनी लक्ष विचलित करून एक लाख 49 हजार 500 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) सायंकाळी सव्वासहा ते रात्री सात वाजताच्या कालावधीत घडला असून याबाबत गुरुवारी (दि. 21) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्पा हिम्मतराव पाटील (वय 57, रा. थेरगाव) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील त्यांच्या पतीसोबत नाशिक फाटा येथून तापकीर चौक, पिंपरी गाव दरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या. सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता त्या नाशिक फाटा चौकातून रिक्षात बसल्या. रस्त्यात त्यांच्या रिक्षामध्ये दोन अनोळखी महिला बसल्या. त्या अनोळखी महिलांनी पाटील यांच्या पर्समधून एक लाख 30 हजारांचे सोन्याचे गंठण, 15 हजारांच्या सोन्याच्या साखळ्या आणि साडेचार हजारांची रोकड पाटील यांचे लक्ष विचलित करून चोरून नेली. रात्री सात वाजता तापकीर चौकात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.