राहुल गांधींच्या चेहऱ्यावरील हिरवी लाईट छायाचित्रकाराच्या मोबाईलची; गृहमंत्रालयाचा खुलासा

0
585

नवी दिल्ली , दि. ११ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील हिरव्या कलरची  लाईट स्नाईपर हल्ल्यासंबधीची नाही. तर  काँग्रेसच्याच छायाचित्रकाराच्या मोबाईलचा प्रकाश आहे,  असे खुलासा  गृहमंत्रालयाने केला आहे.  त्याचबरोबर  राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी ठेवण्यात आलेली नाही, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

काँग्रेसने राहुल गांधी यांच्या जीविताला धोका असून त्यांच्यावर स्नायपरच्या माध्यमातून हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली होती. याबाबत काँग्रेसने  गृहमंत्री राजनाथ सिंह यांना  पत्र लिहिले आहे.  बुधवारी अमेठी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी रोड शो केला होता. या दरम्यान, त्यांच्यावर चेहऱ्यावर हिरवा लेझर लाईट पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर गृह मंत्रालयाने एसपीजीच्या डायरेक्टर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

याबाबत एसपीजीच्या डायरेक्टर यांनी गृह मंत्रालयाला सादर केलेल्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे  की,  या घटनेची व्हिडीओ क्लिपचे बारकाईने  निरीक्षण  करण्यात आले. त्यात ती हिरवी लाईट काँग्रेसच्याच फोटोग्राफरच्या मोबाईलची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच फोटोग्राफरच्या पोझिशनबाबत राहुल गांधी यांच्या खासगी स्टाफला  माहिती देण्यात आली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी  नाही, असे  एसपीजीच्या डायेरक्टर यांनी  सांगितले.