राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठीच हे पाऊल…

0
203

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड करण्याची कारणे सांगितली आहेत. दापोली-मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

योगेश कदम यांनी ट्विट करत राष्ट्रवागी काँग्रेसवर आरोप केले आहेत. “सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक!,” असे योगेश कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या सर्व घडामोडी नंतर शुक्रवारी आपल्याला आवश्यक असलेले संख्याबळ पूर्ण झाले असल्याचा आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात हवे असलेले बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पण त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. आमच्या आमदारांची बैठक होईल आणि त्याच्या पुढील दिशा ठरवली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र मुंबईत कधी येणार यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

भाजपाला दुसरा हिंदुत्ववादी पक्ष नको – उद्धव ठाकरे
देशात केवळ भाजपाच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यातूनच शिवसेना संपवण्याचे कारस्थान रचले आहे. आपल्याच काहींनी भाजपाला साथ देत पाठीत खंजीर खुपसला आहे, पण मी शिवसेना पुन्हा उभी करेन, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. त्याआधी ठाकरे यांनी बंडखोरांना, ‘‘शिवसेना आणि ठाकरे नाव न घेता जगून दाखवा,’’ असे आव्हान दिले.