राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी दबाव – शरद पवार   

0
562

पुणे, दि. २८ (पीसीबी) – लोक प्रतिनिधींना धमकावण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार ईडी, सीबीआय सारख्या एजन्सींचा वापर करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे,  असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची सत्ताधारी पक्षाने एसीबी चौकशी लावली आहे. त्यामुळे त्यांनी भीतीपोटी राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. याशिवाय शिवेंद्रराजे, संग्राम जगताप, दिलीप सोपल आदी नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु आहेत. मात्र हे नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

शिवेंद्रराजे काल मला भेटले आणि त्यांनी पक्ष सोडून जाणार नसल्याचं सांगितले आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सुद्धा आम्ही पक्षासोबत असल्याचे सांगितले आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल काल माझ्यासोबतच होते. तर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेही कुठे जाणार नाहीत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.