राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांचा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

0
675

बीड, दि. ३० (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  हा प्रवेश सोहळा दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी समोर  झाला.

नमिता मुंदडा अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होत्या. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना ‘उमेदवार फुटण्याच्या भीतीने राष्ट्रवादीने बीडमधील उमेदवार जाहीर केल्याचा आरोप केला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या नमिता या सूनबाई आहेत. डॉ. मुंदडा यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीनदा त्या विधानसभेवर गेल्या होत्या. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.