राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द; माजी खासदार गजानन बाबरांच्या तक्रारीची दखल

0
1795

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांचे अनुसूचित जातीचे (एससी) जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. पुण्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र व मूळ जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले असून, हे दोन्ही प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेशही या समितीने दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीसाठी जात चोरणारा राजकीय पक्ष म्हणून पक्षाची ओळख निर्माण झाली आहे.

महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश शेट्टी आणि त्यांचे बंधु उल्हास शेट्टी यांनी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविले होते. त्याच्या आधारे या दोघांनीही महापालिकेच्या अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर निवडणूक लढविली आणि जिंकली. जगदीश शेट्टी हे विद्यानगर प्रभागातून, तर उल्हास शेट्टी हे अंजठानगर प्रभागातून राखीव जागेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर जगदीश शेट्टी यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले. परंतु, या दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करत माजी खासदार गजानन बाबर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने जगदीश शेट्टी यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी पाकरण्याचे आदेश दिले होते. फेरपडताळणीत जगदीश शेट्टी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने ९ डिसेंबर २०१४ रोजी जगदीश शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यानंतर अजंठानगर प्रभागात पोटनिवडणूक झाली आणि शिवसेनेचे राम पात्रे निवडून आले. परंतु, जगदीश शेट्टी यांचे बंधू उल्हास शेट्टी यांच्या जात प्रमाणपत्राविरोधातील दावा प्रलंबित होता.

त्यावर पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी सुरू होती. या समितीने सर्व बाबी तपासल्यानंतर उल्हास शेट्टी यांचेही अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिळालेल्या जात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेशही समितीने शेट्टी यांना दिले आहेत. समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव, सदस्य सचिव हि. शां. गाढे आणि सदस्य वासुदेव पाटील यांनी हा निर्णय दिला आहे.

दरम्यान शेट्टी बंधूंनी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जातीत मोडत असलेल्या कर्नाटकातील “बंट” जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. परंतु, ते या जातीचे नसल्याचे आता न्यायालयात सिद्ध झाले आहे. तसेच बंट ही जात २००२ नंतर अनुसूचित जातीतून वगळण्यात आल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे शेट्टी बंधू हे मूळचे कर्नाटकातील असल्याने त्यांना महाराष्ट्रात मागास जातीचे कोणतेही फायदे किंवा सवलती घेता येत नसल्याचेही पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ देत स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, निवडणुकीसाठी जात चोरणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख निर्माण झाली आहे.