रामविलास पासवान एनडीएसोबतच; लोकसभेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

0
710

पाटणा, दि. २३ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत  आज (रविवार) भाजपाध्यक्ष अमित  शहा,  जदयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार आणि लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांची बैठक झाली. यावेळी बिहारमधील जागावाटपावर त्यांच्यात एकमत झाले असून पासवान यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. यापैकी भाजप १७, जदयू १७ आणि लोकजनशक्ती पक्ष ६ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली.

२०१४ मध्ये भाजपने बिहारमध्ये ३०, लोजपाने ७ आणि रालोसपाने ३ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात भाजपला २२ जागांवर लोजपाला ६ आणि रालोसपाला ३ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपपासून फारकत घेऊन स्वतंत्र लढणाऱ्या जदयूला अवघ्या २ जागांवर विजय मिळविता आला होता. मात्र, नितीश कुमारांचे महत्त्व लक्षात घेता भाजपने स्वत:च्या वाट्याच्या ५ जागा जदयूसाठी सोडल्या आहेत.

दरम्यान, रामविलास पासवान यांनीही अपेक्षित जागा न मिळाल्यास वेगळ्या पर्यांयाचा विचार करावा लागेल, असे म्हटले होते. तसेच पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी तीन राज्यातील विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले होते. त्यामुळे  पासवान एनडीएतून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपने अखेर रामविलास पासवान यांची समजूत काढत त्यांना एनडीएसोबत ठेवण्यात यश मिळवले आहे.