रामदास आठवलेंची भाजपावर नाराजी…

0
377
The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विधान परिषद निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारल्याने पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज असताना आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात २१ मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील एक जागा भाजपाने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइंची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपाइंला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत”.

भाजपला केवळ चार जागा मिळणार असून राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे या जागांसाठी चर्चेत आहेत. इच्छुकांची मोठी रीघ लागली आहे. तरीही एक चांगला मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडण्याबाबत निश्चित विचार करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आठवले यांनी दिली होती. मात्र जाहीर झालेल्या यादीत रिपाइंला एकही जागा देण्यात आलेली नाही.