राधाकृष्ण विखे-पाटीलसह काँग्रेसचे १० ते १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ?

0
498

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) – राधाकृष्ण विखे- पाटील यांचा भाजप प्रवेश होऊन  १ जूनरोजी ते मंत्रिपदाची शपथ घेतील. त्याचबरोबर विखे-पाटील आपल्यासोबत भाजपमध्ये काँग्रेसचे १० ते १२ आमदार घेऊन जातील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शनिवारी लोणी येथे विखे समर्थक १३ आमदारांची गुप्त बैठक झाल्याचेही समजते.

विखे-पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमच्यासाठी विखेंचा निर्णय अंतिम असून ते येत्या १ जून रोजी ते शपथ घेतील, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी केला आहे. संगमनेर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी शनिवारी ( दि.२५) आमदार सत्तार आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित मानले जात आहे. त्यातच शनिवारी लोणी येथे विखे समर्थक १३ आमदारांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विखे पाटलांसोबत अब्दुल सत्तार यांच्यासह आणखी किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसची धुळदाण उडाली आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर   आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह इतर काँग्रेस आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये गेले, तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल.