लोकप्रतिनिधी आहात तर मग …. न्यायमुर्तींनी राणा दाम्पत्यांची चांगलीच केली कानउघडणी

0
254

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तुम्ही जर लोकप्रतिनिधी असाल तरी आपल्या विरोधकांशी आदरात्मक विरोध असावा, अशा शब्दांत न्यायालयाने राणा दाम्पत्या चांगलेच झापून काढले.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणी करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती. न्यायमुर्ती वराळे आणि मोडक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमुर्तींनी राणा दाम्पत्यांची चांगलीच कानउघडणी केली. जर तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तरी आपल्या विरोधकांशी आदरात्मक विरोध असावा. आम्ही याबद्दल आमचं मत एका प्रकरणात व्यक्त केलं होतं. पण हे सर्व बहिऱ्या कानावर पडत आहे हे दुर्दैव आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायमूर्तींनी राणा दाम्पत्यांना चांगलेच सुनावले.

यावेळी राणा दाम्पत्याकडून रिझवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी जे काही गुन्हे दाखल केले आहे, ते रद्द करावे अशी मागणी मर्चंट यांनी केली. कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती त्यामुळे दोघे घराबाहेर पडलेच नाही न काही करता गुन्हा दाखल केला गेला आणि अटक केली गेली. हंगामा त्यांनी केला आणि गुन्हा आमच्यावर दाखल केला. एक गुन्हा दुपारी ४ वाजता दाखल केला गेला आणि दुसरा गुन्हा रात्री ९ वाजता दाखल केला गेला आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती थेट कोर्टात दिली गेली, असं मर्चंट म्हणाले.

ते लोकप्रतिनिधी आहेत कुठेही जाणार नाही. कोणतीही चौकशीला सामोरे जायला तयार आहेत. पुणे, अमरावती आणि उस्मानाबाद ३ ठिकाणी देखील गुन्हे दाखल केले गेले आहेत. घटना एकच पण विविध FIR दाखल करण्यात आल्या. सरकार विरोधात अपशब्द बोलल्याने कलम १२४ अ लावण्यात आला असं कोठडी अहवालात म्हणण्यात आलंय. राणा यांच्या घराबाहेर अनेक शिवसैनिक आले होते ते हंगामा करत होते त्यांना पोलिसांनी सरंक्षण दिले होते याचवेळेस शिवसैनिकांनी रवी राणा यांना धक्काबुक्की केली, असा आरोपही त्यांनी केला.

दोन्ही गुन्हे वेगळे आहेत त्यामुळे वेगळ्या FIR दाखल करण्यात आल्या आहेत. १२४ A पहिल्या एफआयआर मध्ये नमूद आहे. हनुमान चालीसा पठणासाठी एफआय आर दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी नोटीस देऊन त्यांना विनंती केली कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडणारी कृत्य करू नका जेव्हा पोलीस त्यांना ताब्यात घ्यायला घरी आले तेव्हा कायद्याचे पालन आरोपींनी केले नाही. “आम्ही लोकप्रतिनिधी आहेत मी तुमच्या सोबत येणार नाही… आम्हाला हात लावू नका तुम्ही आमच्या घरात आहात” असा वाद नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पोलिसांशी घातला गाडीत बसण्यास ही नकार दिला यामुळे कलम ३५३ म्हणते सरकारी कामात अडथळा आणणे हा गुन्हा दाखल केला, असं घरत यांनी सांगितलं.

कलम १५३ अ म्हणजे चिथावणीखोर वक्तव्य करणे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय कारण त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. सरकार विरुद्ध अपशब्द वापरल्याने कलम १२४ अ लावण्यात आलाय. पहिल्या गुन्ह्यांत ताब्यात घेताना त्यांनी दुसरा गुन्हा केला आणि याच दरम्यान त्यांनी सरकार बद्दल अपशब्द वापरले, असा दावाही घरत यांनी केला.

हनुमान चालीसा म्हणायची होती तर त्यांनी त्यांच्या घरी म्हणायची होती अमरावतीत म्हणायची होती. जाणीवपुर्वक मुंबईला आले. हनुमान चालिसाच्या आड सरकारला आव्हाहन दिले गेले. मुख्यंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचं पठण करून राज्य सरकारला आव्हान देण्याचा आरोपींचा हेतू होता,तसं न करण्याबाबत त्यांना सूचना देणारी नोटीसही बजावली होती. मात्र तरीही ते आपल्या आंदोलनावर ठाम होते, असंही घरत यांनी सांगितले.

तर, आम्ही हनुमान चालिसा कुणाच्या घरात नाही तर घरासमोर वाचणार होतो, असा दावा राणांचे वकील मर्चंट यांनी केला. याचा अर्थ रस्त्यावर वाचणार होतात, पण तो रस्ता कुणाच्या तरी घरचाच होता, असं कोर्टाने परखड मत व्यक्त केलं.

हा गुन्हा जाणूनबूजून दाखल करण्यात आला. जर पहिल्या एफआयआरमध्ये जामीन मिळाला तरी दुसऱ्या आम्हाला पुन्हा अटक करता यावी यासाठीच हा गुन्हा दाखल झाला. घटना एकच असताना दोन वेगळ्या एफआयआर दाखल करणं चुकीचं आहे. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यात स्पष्ट होईल की 353 कलम लावण्याजोग कोणतंही कृत्य केलेलं नाही हे कलम रद्द करा ही आमची मागणी नाही. ही एफआयआर रद्द करून हेच आयपीसी कलम 353 पहिल्या एफआयआरमध्ये समाविष्ट करून घ्या, अशी मागणी राणा दांपत्यांच्यावतीनं हायकोर्टाकडे करण्यात आली.