राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार! पण ‘या’ असणार अटी आणि शर्थी..

0
232
प्रत्येक भाषणात PMC घोटाळ्यावर बोलणार ; राज

मुंबई , दि. २८ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या सभेची जोरदार तयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळाले, असे असतांनाच या सभेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली होती, २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदी चा आदेश काढला. यामुळे राज ठाकरेंची सभा रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

राज ठाकरेंची सभा पुढे ढकलण्यात येणार अशी दाट शक्यता होती परंतु सभा होणारच यावर मनसे कार्यकर्ते ठाम होते. आता गेल्या आठवडाभरापासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. आज दुपारी बारा वाजेपर्यंत राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तसेच परवानगी देताना काही अटी आणि शर्ती घातल्या जाणार आहेत.

राज ठाकरेंच्या सभेसाठी असणार ‘या‘ अटी-शर्थी
१) ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे.
२) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी.
३) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
४) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.
५) 1 मे रोजी महाराष्ट्रदिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये.
६) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
७) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये, वाहन पार्किंगचे नियम पाळावे.
८) सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.
९) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.
१०) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.