योग एक जीवन शैली…

0
825

योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम असे आपण समजतो. आसन आणि प्राणायाम हा योग मधील काही भाग आहे. संपूर्ण योग एक जीवन शैली आहे. महर्षी पतंजली ॠषींनी इ. स. पूर्व 200 वर्षांपूर्वी पातंजल योग सूत्र हा ग्रंथ लिहिला. महर्षी पतंजली हे शेषनागाचे आवतार होते. पातंजल योग सूत्र या ग्रंथात त्यांनी चार पादात ( अध्याय ) योगाचे वर्णन केले आहे.

पहिल्या पादातील पहिल्या सूत्रात त्यांनी योग एक अनुशासन आहे असे सांगितले आहे. त्या नंतर चित्ताला नियंत्रीत ठेवणे म्हणजेच योग अशी योगाची व्याख्या सांगितली आहे. चित्त म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार या तिन्ही अवस्थांचा एकत्रित समुह होय. चित्त भूमी आणि चित्त वृती यांचे ही विस्तृत वर्णन महर्षींनी केले आहे.

समस्त मानव जातीला मन, बुद्धी आणि अहंकार यांना नियंत्रीत कसे ठेवावे या साठी महर्षी पतंजलीनी अष्टांगयोग सांगितला आहे. अष्टांगयोग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी.

यम : यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह. मनुष्याने समाजात कसे वागावे हे यम मधील घटक सांगतात.
नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान. आपण स्वतः कसे वागावे हे नियम मधील घटक सांगतात.

अहिंसा : हिंसा न करणे. काया वाचा मने अशा कोणत्याही स्थितीत हिंसा करू नये.
प्रत्येक प्राणीमात्राला जगण्याचा अधिकार आहे त्यांची हिंसा होईल असे कृत्य करू नये. तसेच दुसर्या कडूनही करून घेऊ नये आणि आपल्या मनातही दुसर्या बद्दल हिंसात्मक भाव येऊ देऊ नये.

सत्य : नेहमी खरे बोलावे. जे आपल्या दृष्टीस दिसते तेच बोलणे.

अस्तेय : चोरी करू नये. चोरी ही काया वाचा मने अशा कोणत्याही प्रकारे करू नये. चोरी ही तीन प्रकारची सांगितली आहे.

स्वतः प्रत्यक्ष चोरी करू नये. दुसर्याला करायला सांगू नये आणि मनातही दुसर्याच्या संपत्ति बाबत हेवा ठेवू नये.

ब्रम्हचर्य : प्रापंचिक जीवनात आपल्या इच्छा वर नियंत्रण ठेवने म्हणजेच संयम बाळगणे याला ब्रम्हचर्य असे संबोधले आहे.

अपरिग्रह : आपल्या शरीरासाठी ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या पेक्षा जास्त सामुग्री किंवा साधनांची साठवनूक करू नये.

नियम :
शौच : शौच म्हणजे शुध्दता. शरीराची शुध्दता पाण्याने होते मनाची शुध्दता ज्ञानाने होते. म्हणून शुध्द आणि पवित्र ज्ञान मिळवणे महत्वाचे आहे.

संतोष : घनघोर प्रयत्न करून जे फळ प्राप्त होईल त्यात समाधान मानने.

तप : सर्वोच्च धेय्य प्राप्ती साठी येणार्या अडचणी वर मात करून धेय्या पर्यंत पोहचणे म्हणजे तप होय.

स्वाध्याय : निरंतर चांगले ग्रंथ तसेच वेगवेगळ्या शास्रीय पुस्तकांचा अभ्यास करून ज्ञान मिळवणे.

ईश्वरप्रणिधान : ईश्वराचे अस्तित्व मान्य करून जे जे कर्म ईश्वरीय शक्ती मुळे केले ते ईश्वरचरणी अर्पण करणे. उपकाराची भावना न ठेवणे.

आज समाजात प्रत्येक जण केलेल्या कार्या बाबत मनात मी पणाचा भाव ठेवतो. आपल्या आयुष्यातील ठराविक वयोमानानुसार आपण ते कार्य ईश्वराने दिलेल्या व्यवस्थे नुसार करतो हे आपण विसरून गेलो आहोत. यामुळे आपला अहंकार वाढत जातो आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगत असतो. तसे पाहिले तर आपण अती सूक्ष्म अणु – रेणु ही बनवू शकत नाही ते तर निसर्गानेच निर्माण केले आपण फक्त निसर्गाने दिलेल्या बुद्धीच्या माध्यमातून त्याला शोधून काढले हे आपण विसरतो आहे.

आसन : कोणत्याही आसनात स्थिर स्थितीत कोणताही त्रास होणार नाही किंवा आसन करणारा आनंदी असेल अशा स्थितीला स्थिर सुखं आसन म्हटले आहे.

प्राणायाम : नैसर्गिक रित्या श्वास घेणे आणि सोडणे याला छेद देणे म्हणजे प्राणायाम होय.
पतंजली ॠषींनी प्राणायामचे चार प्रकार सांगितले आहेत. श्वास बाहेर रोखून ठेवणे, श्वास आत रोखून ठेवणे, श्वास आहे त्या स्थितीत रोखून ठेवणे आणि श्वासाची जी गती असेल त्या स्थितीच्या विरुद्ध श्वास घेणे किंवा सोडणे असे हे चार प्रकार आहेत.

प्रत्याहार : पंच ज्ञानेंद्रियांचे जे बहिर्मुखी कार्य आहे त्यांना अंतर्मुख करणे म्हणजे प्रत्याहार होय.
आपली पंच ज्ञानेंद्रिये निद्रिस्त अवस्था सोडून बाकी वेळ बाह्य जगातील स्थितीत केंद्रीत म्हणजे बहिर्मुख अवस्थेत असतात त्यांना डोळे बंद करून आपल्या शरीरातील स्थिती मधे अंतर्मुख करणे. आपले चित्त पंचज्ञानेद्रियामुळे भटकत राहते ते अंतर्मुख झाल्यावर शांत होण्यास मदत होते.

धारणा : एक ठिकाणी मन स्थिर करणे म्हणजे धारणा होय.

ध्यान : धारणेत एकरूपता येणे म्हणजेच त्याच ठिकाणी निरंतरता राखणे म्हणजे ध्यान होय.

समाधी : ध्यानाच्या निरंतर अभ्यासानंतर शरीराचा केवळ नाममात्र अभास होतो आणि स्वतःच्या स्वरूपाला आपण विसरून जातो आणि फक्त ध्यान ही मुख्य राहते अशा स्थितीला समाधी म्हणतात. समाधी प्राप्तीनंतर कैवल्य प्राप्ती होते.

अशा प्रकारे महर्षी पतंजली ऋषींनी मानवजातीच्या कल्याणासाठी अष्टांगयोग सांगितला आहे. वरील प्रकारे अष्टांगयोगाचे पालन केल्याने मानवाच्या जीवनाचे कल्याण होणारच आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या बाबींचा अनेक शतका पासून जगातील सर्वच देशातील सरकारांनी त्यांच्या घटनेत सामावेश केलेला आहे.

हिरामण भुजबळ
एम. ए. योगशास्त्र
आजीवन सदस्य पतंजली योग पीठ