क्रांतिवीर चापेकर बंधूच्या स्मारकासाठी राज्य शासन ४१ कोटींचा निधी देणार

0
182

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निधी देण्यास मान्यता; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, दि.२१(पीसीबी) – क्रांतिवीर चापेकर बंधूचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निधी शासनाकडून देण्यात येईल. यासाठी महापालिकेने तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. शासनकडून स्मारकासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

खासदार बारणे यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथीगृहावर मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाला निधी देण्याची घोषणा केली. बैठकीस आमदार अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह,चापेकर समितीचे गिरीष प्रभूणे,मिलिंद देशपांडे,रविंद्र नामदे,ॲड सतिष गोरडे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चापेकर बंधुचा जुनावाडा ही पुरातन ऐतिहासिक वास्तु होती. हा वाडा मोडकळीस आल्यामुळे क्रांतीवीर चापेकर यांची पुरातन वास्तु नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारकडून १२ जून १९९७ रोजी क्रांतीवीर चापेकर बंधुचे स्मारक उभारण्याबाबत पिंपरी – चिंचवड महापालिकेला आदेश प्राप्त झाले. त्यानुसार, सन १९९७ मध्ये स्मारकाचे पहिल्या टप्प्याअंतर्गत फाऊंडेशन करण्यात आले. मी १९९७-९८ मध्ये महापालिका स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पहिल्यांदा ३५ लाख रुपये दिले होते. चापेकर वाड्याची दुरुस्ती केली होती. त्यानंतर पालिकेने १२ कोटी रुपये खर्च करून वाड्याची काही कामे केली. महापालिकेने सर्व खर्च करणे अपेक्षित असताना उर्वरित ४१ कोटी रुपये खर्च करणे शक्य नसल्याचे महापालिकेने सांगितले. त्यामुळे राज्य सरकार कडून निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करून मंगळवारी बैठक आयोजित केली. बैठकीत चापेकर स्मारकाच्या कामासाठी आवश्यक ४१ कोटी रुपयांचा निधी देण्याची विनंती केली. या कामामध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावर माहिती दिली जाणार आहे. यासाठी ४१ कोटी रुपये निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. नव्या पिढीला चापेकरांचे कार्य, इतिहास माहिती होणार आहे. स्मारकात काही समूह शिल्प असणार आहेत.

ऐतिहासिक काळास साजेशी अंतर्गत सजावट!

स्मारकाच्या तिस-या टप्प्यातील दुस-या भागात करायच्या कामामध्ये ऐतिहासिक पुरातनकाळास साजेशी अंतर्गत सजावटीची विविध कामे आणि पहिल्या भागात राहिलेले आरसीसीचे काम प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने त्याकाळात वापरण्यात येणा-या वस्तु, भांडी, वेषभुषा अलंकार, युद्ध कलेचे साहित्य, तात्कालीन व्यक्तींचे पुतळे, पुरातन काळातील प्रसंगाचे म्युरल्स, गडकोट, किल्ले यांच्या प्रतिकृती, पुरातन भिंतीचित्रे आदी कामांचा समावेश असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणारगिरीश प्रभुणे यांनी स्मारकाच्या उभारणीची आतापर्यंतची वाटचाल मांडली. तसेच स्मारकाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी येण्यास मान्यता दिल्याचे सांगितले.