युती होणार की नाही यावरच मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीची गणिते

0
3835

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – भाजप आणि शिवसेनेत युती न झाल्यास मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही. युतीचे संकेत स्पष्ट नसल्याने शहरातील शिवसैनिकांनी मावळ मतदारसंघातील निवडणूक अजून तरी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. शिवसेना-भाजपची युती होणार की नाही हे स्पष्ट झाल्यानंतरच या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सर्व राजकीय खेळ्या या युतीवरच अवलंबून असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी युती होईल आणि युतीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला मिळेल, या आशेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आहेत. पण युती झाल्यास हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न राहिल. हा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात भाजपला मिळाला, तर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. तसे झाले, तर राष्ट्रवादीला आपली राजकीय रणनिती बदलावी लागणार आहे. युती होईल किंवा नाही, मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येईल का, असे अनेक प्रश्न असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेने सुद्धा लोकसभा निवडणूक अजून तरी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.

ऐनवेळी भाजपसोबत दोन हात करण्याची वेळ आल्यास तशीही शिवसेनेची तयारी दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही मावळ मतदारसंघात “वेट अँड वॉच”ची भूमिका ठेवल्याचे पाहायला मिळते. युतीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघ भाजपला मिळाला आणि आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपचे उमेदवार असले, तर राष्ट्रवादीसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण होणार आहे. राष्ट्रवादीकडे आमदार जगताप यांच्याविरोधात सक्षम उमेदवार नाही. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या वाढदिवसांपासून लोकसभेची तयारी सुरू केली होती. मात्र अचानकपणे आमदार अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर संजोग वाघेरे यांची चलबिचल सुरू झाली आहे.

दुसरीकडे युती व्हावी आणि आपणाला दुसऱ्यांदा खासदार सहज होता यावे, असे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे स्वप्ने पाहत आहेत. परंतु, युतीचे स्पष्ट होत नसल्याने खासदार बारणे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच बारणे हे खासदारकीसाठी दुसऱ्यांदा तयारी करत असले, तरी पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत धूसफूस आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेती धूसफूस आणखी वाढीला लागणार आहे. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होण्याची शक्यता आहे. एकंदरीत मावळ मतदारसंघाची सर्व राजकीय गणिते युती होणार का?, युती झाल्यास मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, यावरच अवलंबून आहेत.