…या पुढाऱ्यांमुळे ऑक्सिजन पाईप लाईनला सहा महिने उशिर

0
1202

– नेत्यांची ठेकेदारांची रिंग नडली, अन्यथा ५०० बेड उपलब्ध झाले असते

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी हजारो कोरोना रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलचे उंबरे झिजवत आहेत. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावलेत. अत्यवस्थ पेशंटला ऑक्सिजन बेड मिळायला आजही अडचण येते आणि त्याला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादीतील टक्केवारीचे राजकारण कऱणारे भ्रष्ट नेते आणि त्यांचे बगलबच्चे जबाबदार आहेत. कोरोनाची पहिला लाट असतानाच शहरातील जिजामाता, भोसरी, थेरगाव आणि आकुर्डी या चार नवीन रुग्णालयांतून आयसीयु बेड तत्काळ उपलब्ध करण्याची योजना तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आणली होती. त्यासाठी गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाची सुमारे २६ कोटींची निविदा सप्टेंबर २०२० मध्येच काढली होती. काही नेत्यांनी त्या कामात टक्केवारीसाठी रिंग केली, मात्र त्याचा भंडाफोड झाल्याने ती फसली. नेत्यांचा डाव फसला म्हणून ऑक्सिजन बेड लटकले. ५०० ऑक्सिजन बेडचे काम तब्बल सहा महिने रखडले आणि त्याला जबाबदार सर्वस्वी नेतेमंडळीच असल्याचे आता प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. आज कोरोना आणिबाणीच्या संकटात गोरगरिब रुग्णांसाठी यापूर्वीच हे ५०० बेड उपलब्ध झाले असते, असे आता समोर आले आहे. संतापजनक अशा या विषयावर विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनीसुध्दा आळीमिळी गुपचिळी केल्याने संशयाचे धुके वाढले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव आणि आकुर्डी या चार रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन बसविण्याचा मूळ प्रस्ताव सुरवातीला सप्टेंबर २०२० मध्ये मांडण्यात आला होता. महापालिकेच्या भांडार विभागाने त्याची निविदा नोटीस (क्रमांक ४३-२०२०-२१) ४ जानेवारी प्रसिद्ध केली होती. २६ कोटी ६१ लाख रुपयांच्या या निविदेसाठी सुरुवातीला ५ निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता. काही बड्या नेत्यांनी त्यात ठराविक ठेकेदारांच्या मदतीने रिंग केल्याचा संशय व्यक्त केला गेला. एका मोठ्या स्पर्धक ठेकेदाराला पध्दतशीर बाजुला ठेवण्यात आले. ज्या ठेकेदाराने मुंबईच्या कुपर, एम्स तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियम आवारात उभारलेल्या कोव्हिड
रुग्णालयाचे काम ज्याने केले तोच ठेकेदार महापालिकेने अपात्र ठरविला होता. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदा अखेर रद्द केली होती. यानंतर तातडीने दोन दिवसांत हीच निविदा पुन्हा नव्याने (सूचना क्रमांक ४८- २०२०-२१) प्रसिद्ध करण्यात आली. दुसऱ्यावेळी ९ जणांनी निविदा भरली होती. स्पर्धा झाली आणि २६.६१ कोटींचे काम ३० टक्के कमी दराने म्हणजे १८.३१ कोटींना दिले. तब्बल आठ कोटी ३० लाखांची बचत झाली. ठेकेदारांची रिंग तोडल्याने सव्वा आठ कोटींची लूट थांबली.
स्थायी समितीने हा विषय मंजूर केला, पण त्यावेळी स्थायी समिती सदस्य असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेने आकांडतांडव समितीच्या बैठकीत केला होता.

पुढे स्थायी समितीने मंजूर केलेल्या कामालाही नेत्यांना खोडा घातला. हितसंबंधीत नेते मंडळींनी काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे देत हे काम पुन्हा दोन आठवडे लटकत ठेवले होते. पंधरा दिवस फाईल या टेबलावरुन त्या टेबलावर करत अक्षरशः घोळवत ठेवली. कामाचा आदेश देण्यासही टाळाटाळ केल्याने अत्यंत महत्वाचा वेळ वाया गेला. अखेर पंधरा दिवसांपूर्वीच या कामाचे आदेश देण्यात आले. हे काम आता १५ दिवसांत पूर्ण होईल आणि शहराला आणखी ५०० ऑक्सिजन बेड उपलब्द होतील, असे सांगण्यात येते.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात ऑक्‍सिजन बेडची कमतरता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या चारही रुग्णालयात गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यास नव्याने बेड उपलब्ध होऊ शकतात. कोरोना रुग्णांचा विचार करून तरी या कामाला गती देण्याची गरज होती. केवळ टक्केवारीच्या भ्रष्टा कारभारामुळेच तब्बल सहा महिने ऑक्सिजन बेडचे काम रखडले होते, असे आता स्पष्ठ झाले आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी या विषयावर बोलायला तयार नाहीत.