…म्हणून सोमय्या यांचा त्याच पायरीवर सत्कार

0
183

पुणे, दि. ११ (पीसीबी) – भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपाच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

किरीट सोमय्या यांनी यावेळी भाषणही केलं. ते म्हणाले, “पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत ४ ठेके दिले.”

नेमकं प्रकरण काय?
किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.
पुणे महापालिकेने परवानगी नाकारल्याने भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. भाजप नगरसेवक आणि कार्यकर्ते पालिकेच्या पायरीवर मोठ्या संख्येने जमले. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. तेवढ्यात सोमय्या पालिकेच्या आवारात आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र, सोमय्यांना धक्काबुक्की होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस त्यांना पालिकेत घेऊन गेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद’, ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.